कोणता झेंडा घेऊ…ते जनजागृती यंदा गणेशोत्सवासाठी वैविध्यपूर्ण देखावे | पुढारी

कोणता झेंडा घेऊ...ते जनजागृती यंदा गणेशोत्सवासाठी वैविध्यपूर्ण देखावे

सुवर्णा चव्हाण

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात पुणेकरांना सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय विषयांवरील वैविध्यपूर्ण हलते आणि स्थिर देखावे पाहायला मिळणार असून, गणेश मंडळांकडून देखाव्यांसाठीचे बुकिंगही सुरू झाले आहे. झाडे लावा, झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळा इथपासून ते कोणता झेंडा घेऊ हाती, पावनखिंडपर्यंतच्या वेगवेगळ्या विषयांवर हलते देखावे तर पंचगंगा, महादेव रथ, गजलक्ष्मी रथ, भक्ती रथ… विषयांवरील स्थिर देखावेही यंदा गणेशोत्सवात पाहता येणार आहेत. खास करून सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवरील हलत्या देखाव्यांना प्रतिसाद आहे, तर मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठीही विविध विषयांवरील स्थिर देखाव्यांसाठी बुकिंग केले आहे.

गणेशोत्सवाला एक महिना उरला असून, त्यासाठीची तयारीही मंडळांकडून सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारे, सर्जिकल स्ट्राइक, भारतीय जवान, जातिभेद निर्मूलन, कचरा व्यवस्थापन, गडकिल्ले संवर्धन, पावनखिंड अशा विविध विषयांवरील काही हलते देखावे यावर्षी पुणेकरांचे लक्ष वेधणार आहेत. पहिल्या दिवशी आणि विसर्जन मिरवणुकीत वैविध्यपूर्ण विषयांवरील स्थिर देखावेही पाहता येणार आहेत.

हलते देखावे गेली अनेक वर्षे तयार करणारे सतीश तारू म्हणाले, ‘हलते देखावे तयार करण्यासाठी चार महिन्यांपूर्वीच तयारी सुरू केली आणि आता काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा गणेशोत्सवासाठी मंडळांकडून हलत्या देखाव्यांसाठी चांगला प्रतिसाद आहे. जवळपास गणेशोत्सवासाठी 20 हलते देखाव्यांचे सेट तयार केले आहेत. 14 गणेश मंडळांनी हलत्या देखाव्यांसाठी बुकिंग केले आहे. ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक प्रबोधनपर हलते देखावे यंदा तयार केले आहेत. एका देखाव्याच्या सेटमध्ये चार ते आठ फायबरच्या पुतळ्यांचा समावेश केला आहे. प्रत्येक पुतळ्याला देखाव्यांच्या विषयांप्रमाणे साजेशा वेशभूषा, आभूषणेही तयार केली आहेत.’

गणेशोत्सवाचा पहिला दिवस आणि गणेश विर्सजन मिरवणुकीसाठीच्या रथावर यंदा स्थिर देखाव्यांसाठीही मागणी होत आहे. त्यात प्रामुख्याने ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांचा समावेश आहे. पंचगंगा, महादेव रथ, गजलक्ष्मी रथ, भक्ती रथ असे देखावे तयार करण्यात आले आहेत.
                                      – संदीप गायकवाड, स्थिर देखावे तयार करणारे कलाकार

राजकीय देखावे…
यंदा राजकीय घडामोडींवर हलते देखावे तयार करण्यात आले असून, त्याला गणेश मंडळांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोदी सरकार, महाराष्ट्रातील राजकीय बदल आणि कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊ हाती…या संकल्पनेवर आधारित देखावे तयार करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

अहमदनगर शहरावर 200 कॅमेर्‍यांची नजर

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित

Back to top button