अहमदनगर शहरावर 200 कॅमेर्‍यांची नजर | पुढारी

अहमदनगर शहरावर 200 कॅमेर्‍यांची नजर

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी उद्घाटन झाले. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून उभारण्यात आलेली 200 कॅमेर्‍यांच्या सीसीटीव्हीची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. गुन्हेगारी कृत्य करणार्‍यांसह आता जणू प्रत्येक नगर शहरावरच या सीसीटीव्ही यंत्रणेची शहरात ठिकठिकाणी बसविलेल्या 200 कॅमेर्‍यांच्या माध्यमातून 24 तास नजरराहणार आहे.

खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर आदी या वेळी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, की अशा प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा शहरात कार्यान्वित करण्याची शहरवासीयांची मागणी होती, ती आज या निमित्ताने पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील 51 चौकांमध्ये 204 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दुसर्‍या टप्प्यात आणखी 200 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या यंत्रणेमुळे शहरांतर्गत व शहराबाहेर होणार्‍या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास मदत होऊन गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनालाही यामुळे आळा घालता येणार आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगार पळून जातात. अशा वेळी या कॅमेर्‍यांमुळे गुन्हेगारांच्या वाहनांचा क्रमांक, तसेच त्यांचे चेहरे ओळखता येणे शक्य होणार आहे. या यंत्रणेबरोबरच उद्घोेषणा यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली असून नियंत्रण कक्षातून नागरिकांना सूचना देणेही यामुळे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा

Payal Jadhav : कोण आहे शिपायाची लेक पायल जाधव? नागराज मंजुळेला मिळाला नवा चेहरा

शिवशाही बसला नारायणगाव येथे अपघात; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

संगमनेर : अतिक्रमणित रस्ते पाणंद अभियानातून मोकळे होणार : राधाकृष्ण विखे

Back to top button