Team India Opener Pair : टीम इंडियाच्या टी-20 सलामी जोडीत पुन्हा बदल! | पुढारी

Team India Opener Pair : टीम इंडियाच्या टी-20 सलामी जोडीत पुन्हा बदल!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Opener Pair : भारतीय संघ 18 ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्याला सुरुवात करणार आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया येथे तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. या मालिकेसाठी अनेक नवीन खेळाडूंची संघात निवड करण्यात आली आहे. या नवख्यांनी प्रदर्शन चांगले केल्यास त्यांना अगामी आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत संधी मिळेल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पुन्हा एकदा सलामीच्या जोडीत बदल

संघात ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग आणि जितेश शर्मासारखे युवा खेळाडू दिसणार आहेत. त्याचबरोबर या संघात संजू सॅमसन हा एकमेव अनुभवी फलंदाज असेल. याशिवाय शिवम दुबेचेही तब्बल साडेतीन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. शुभमन गिल आणि ईशान किशन हे दोघेही या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत, म्हणजे पुन्हा एकदा सलामीच्या जोडीत बदल होणार आहे. (Team India Opener Pair)

तिसरे वेगळे कॉम्बिनेशन

भारतीय संघाचा नियमित कर्णधार असलेल्या रोहित शर्माने 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत त्याच्या अनुपस्थितीत फक्त शुभमन गिल आणि ईशान किशन डावाची सुरुवात करताना दिसले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर इशानला वगळण्यात आले. त्यानंतर यशस्वी जैस्वालला टीम इंडियात स्थान मिळाले आणि त्याने शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात केली. तिसऱ्या आणि पाचव्या टी-20 मध्ये ही जोडी अपयशी ठरली पण चौथ्या टी-20 सामन्यात या जोडीने 165 धावांची सलामी भागीदारी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता या दोन कॉम्बिनेशननंतर तिसरे वेगळे कॉम्बिनेशन आयर्लंड मालिकेत पाहायला मिळणार आहे. (Team India Opener Pair)

आयर्लंडमध्ये कोण देणार सलामी? (Team India Opener Pair)

आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या संघात सलामीवीर म्हणून गायकवाड आणि जैस्वाल उपस्थित आहेत. नियमित सलामीवीर राहिलेला असा कोणताही खेळाडू नाही. ऋतुराजने 2021 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले आणि त्यानंतर तो केवळ 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. त्याने 8 डावात एका अर्धशतकासह 135 धावा केल्या आहेत. जैस्वालने वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-20 मध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात तो 1 धाव करून बाद झाला. पण दुसऱ्याच सामन्यात त्याने 80 धावांची शानदार खेळी साकारली. आता आयर्लंड दौऱ्यावर गायकवाड आणि जैस्वाल ही जोडी भारतासाठी कितपत चुरस निर्माण करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टीम इंडिया

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि आवेश खान.

Back to top button