Mount Everest : माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचे स्वप्न महागणार | पुढारी

Mount Everest : माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचे स्वप्न महागणार

काठमांडू : जगभरातील तमाम गिर्यारोहक सर्वात उंच पर्वत शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्याची स्वप्ने पाहत असतात. मात्र, आता ते स्वप्न महाग होण्याची शक्यता बळावली आहे. नेपाळ सरकारने नुकतेच असे स्पष्ट केले की, 2025 पासून माऊंट एव्हरेस्टवर चढण्यासाठी परवानगी प्राप्त करण्यासाठी भराव्या लागणार्‍या रॉयल्टीत वाढ करण्याचा विचार करण्यात येत आहे. ही रॉयल्टी चार हजार अमेरिकन डॉलरने वाढवून ती 15 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेे 12,47,000 रुपये करण्याचा नेपाळ सरकारचा विचार आहे.

समुद्रसपाटीपासून 8,848.86 मीटर उंच असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी रॉयल्टी म्हणून 11 हजार अमेरिकन डॉलर म्हणजे 9,14,000 रुपये भरावे लागतात; तर नेेपाळी पर्यटकांना 75 हजार नेपाळी रुपये भरावे लागतात.

माऊंट एव्हरेस्टसंबंधीच्या रॉयल्टी विभागाचे प्रवक्ते युवराज खातीवाडा यांनी सांगितले की, नेपाळी पर्यटन विभागाने 2025 पासून माऊंट एव्हरेस्टवर चढाई करू इच्छिणार्‍या प्रत्येक विदेशी नागरिकासाठी 15 हजार अमेरिकन डॉलर करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला आहे. यास नेपाळ सरकारकडून मंजुरी मिळताच नवा रॉयल्टी दर लागू होणार आहे.

विदेशी पर्वतारोहींसाठी सध्या नेपाळच्या साऊथ फेसपासून चढण्यासाठी 11 हजार अमेरिकन डॉलर मोजावे लागतात. हाच दर 2015 पूर्वी 10 हजार अमेरिकन डॉलर इतका होता. मात्र, त्यानंतर रॉयल्टी शुल्कात एक हजार अमेरिकन डॉलरने वाढ करण्यात आली होती. मात्र, 2025 नंतर हेच रॉयल्टी शुल्क 15 हजार अमेरिकन डॉलरपर्यर्ंत वाढणार आहे. म्हणजेच माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न महागणार आहे.

Back to top button