Slap therapy : ‘या’ ठिकाणी स्‍लॅप थेरपीने त्‍वचा होते अधिक सुंदर, तरूण आणि तजेलदार | पुढारी

Slap therapy : 'या' ठिकाणी स्‍लॅप थेरपीने त्‍वचा होते अधिक सुंदर, तरूण आणि तजेलदार

सेऊल : सध्याच्या धकाधकीच्या आणि घाईगडबडीच्या काळात अनेकांना, विशेषतः महिलांना त्वचा व केसांची काळजी घेण्यास फारसा वेळ नसतो. अशावेळी दक्षिण कोरियात त्वचेच्या आरोग्यासाठी ‘स्लॅप थेरपी’ लोकप्रिय झाली आहे. त्याबरोबरच डोळ्यांमधून अश्रू येणेही त्वचेसाठी लाभदायक ठरते असे तिथे मानले जाते. स्लॅप थेरपी आणि टिअर थेरपी आता दक्षिण कोरियाबरोबरच अन्यही देशांमध्ये लोकप्रिय होऊ लागली आहे.

दक्षिण कोरियात मानले जाते की जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्या मनावरील ताण हलका करण्याबरोबरच या अश्रूंचा आपल्या त्वचेलाही लाभ होत असतो. स्लॅप आणि टिअर थेरपीचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे आपल्याला अनेक रोगांपासूनही दूर राहता येते, असे तेथील लोक मानतात. जुन्या काळातील भाषेनुसार कुणी आपल्या ‘श्रीमुखात भडकावली’ किंवा आताच्या भाषेत ‘कानशिलात लगावली’ तर आपल्याला त्याच्या असह्य वेदना होतात आणि त्यामुळे अनेक आजारही उद्भवू शकतात. डोळ्याच्या, गालाच्या व कानाच्या समस्याही यामुळे निर्माण होऊ शकतात. मात्र, हीच क्रिया हलक्या हाताने आणि प्रेमाने केली जाते त्यावेळी ती लाभदायक ठरते.

जेव्हा आपण आपल्या गालावर हलकी चापटी मारतो तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या चेहर्‍यावर आणि त्वचेवर होऊ शकतो. हलकेच चापटी मारल्याने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. यालाच ‘स्लॅप थेरपी’ असे म्हणतात. ही संकल्पना खरं तर दक्षिण कोरियातील आहे. याद्वारे आपल्या त्वचेची सुंदरता आणखी वाढते, असे तिकडे मानले जाते. यामध्ये रोज गालावर सुमारे पन्नास वेळा हलक्या चापट्या मारल्या जातात. या थेरपीमुळे चेहर्‍यावरील छिद्रं कमी होतात. सोबतच रक्त संचार वाढतो. चेहर्‍याचे स्नायू कसतात आणि त्यामुळे आपली त्वचा ही अधिक सुंदर, तरुण आणि तजेलदार होते. अशा थेरपीने सहा महिन्यांत फरक जाणवतो असे दक्षिण कोरियात म्हटले जाते.

Back to top button