अंबाती रायुडू सीपीएलमध्ये खेळणार | पुढारी

अंबाती रायुडू सीपीएलमध्ये खेळणार

चेन्नई, वृत्तसंस्था : कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल)मधील सेंट किटस् अँड नेव्हिस पॅट्रिओटस् संघाने आगामी हंगामासाठी मार्की खेळाडू म्हणून अंबाती रायुडू याला करारबद्ध केले. सीपीएलमध्ये खेळणारा तो प्रवीण तांबे याच्यानंतर दुसरा भारतीय ठरणार आहे. या वर्षी मे महिन्यात चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या पाचव्या आयपीएल विजेतेपदामध्ये मोठा वाटा उचलल्यानंतर 37 वर्षीय रायुडूने आंतरराष्ट्रीय आणि भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टेक्सास सुपर किंग्जने रायुडूला अमेरिकेमधील मेजर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी करारबद्ध केले होते; परंतु लीग सुरू होण्याच्या पाच दिवस आधी रायुडूने माघार घेतली.

बीसीसीआयने भारताच्या निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंसाठी एक वर्षाचा कूलिंग कालावधीचा नियम आणण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे रायुडूने ही माघार घेतली. निवृत्तीनंतर 1 वर्षाच्या कूलिंग कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळता येणार आहे. या नियमातून रायुडूला सूट मिळाल्यास, परदेशातील लीगमध्ये अन्य भारतीय खेळाडूंचाही खेळण्याचा मार्ग मोकळा होईल. तर कर्नाटकची श्रेयंका पाटील ही महिला सीपीएलमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय ठरणार आहे. तिला गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्सने करारबद्ध केले आहे.

ब्रेव्हिससोबत खेळणार

रायुडू दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश आणि जॉर्ज लिंडे व अफगाणिस्तानचा इझारूल हक नाविद यांच्यासोबत परदेशी खेळाडूंमध्ये सामील होईल. 16 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर 2023 या कालावधीत ही लीग पार पडणार आहे.

Back to top button