लोणी-धामणी : पावसासाठी शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे | पुढारी

लोणी-धामणी : पावसासाठी शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे

लोणी-धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांना पाणीपुरवठा करणारे हुतात्मा बाबू गेनू जलसागर (डिंभे धरण) 82 टक्के भरले आहे. मात्र, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी धामणी परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काळात जोरदार पाऊस पडला नाही, तर शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे राहणार आहे. आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, आहुपे खोर्‍यात गेल्या एक महिन्यापासून संततधार पाऊस पडत असल्याने दिवसागणिक डिंभे धरणाचा पाणीसाठा वाढत आहे.

दुसरीकडे आंबेगावच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी, शिरदाळे, पहाडधरा या दुष्काळी गावांमध्ये पावसाने दडी मारल्याने या भागातील ओढे, नाले, कोरडे ठणठणीत पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या भागात पावसावर शेती अवलंबून असल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. पावसाने दडी मारल्याने तर या परिसरात पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने त्वरित चारा छावण्या सुरू केल्या नाही, तर येथील शेतकऱ्यांसमोर स्थलांतराशिवाय पर्याय नाही, असे काही जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

कायमस्वरूपी पाणी योजना आवश्यक

गेल्या चार ते पाच वर्षांच्या तुलनेत या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे यापुढे पावसाच्या पाण्यावर शेती करणे कठीण होईल. परिणामी या भागात पिण्याच्या पाण्याबरोबरच कायमस्वरूपी एखादी पाणी योजना राबवावी, अशी मागणी खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष विठ्ठल ढगे पाटील व संचालक फकिरा गोविंदा आदक यांनी केली आहे.

हेही वाचा

Terrorist Attack : काश्मीरमध्ये गत पाच वर्षात झाले 761 दहशतवादी हल्ले

उरुळी देवाची, फुरसुंगी गावांचा आज फैसला!

सिंधुदुर्ग : गट शिक्षणाधिकारी कार्यालयात भरवली शाळा; हेवाळे ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन

Back to top button