व्हिएतनाममध्ये दिसले गुलाबी आकाश! | पुढारी

व्हिएतनाममध्ये दिसले गुलाबी आकाश!

हॅनोई : आकाश अचानक गुलाबी रंगाने उजळून निघाले तर एकवेळ फक्त ही कविकल्पना वाटू शकेल. पण, व्हिएतनाममध्ये प्रत्यक्षातच असा अनोखा नजारा पाहायला मिळाला आणि त्यावेळी तेथील नागरिकांचा, पर्यटकांचा यावर क्षणभर विश्वासदेखील बसला नाही.

गुलाबी रंग प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. अशा गुलाबी रंगाने आकाश अचानक उजळून निघाले तर ते निश्चितच आश्चर्यकारक ठरते. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, ही अद्भुत घटना व्हिएतनाममध्ये अनुभवास आल्याचा दावा यात केला गेला आहे. ट्विटरवर एव्हरेन मेराक या यूजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 18 लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे.

गुलाबी सूर्यास्ताचा हा अनोखा व्हिडीओ ड्राईव्ह करताना घेतला आहे. यावेळी काही बाईकस्वारही होते. यातील काही जण गुलाबी आकाश आपल्या कॅमेर्‍यात कैद करत होते. आता आकाश गुलाबी का दिसते, याचे कारणही तितकेच खास. आकाशात वेगवेगळे रंग दिसण्याची अनेक शास्त्रीय कारणे असतात. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्कॅटरिंग. सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी सूर्याचे पृथ्वीपासून अंतर कमी होणे व वाढणे आणि त्यावेळची वायूमंडळाची स्थिती यावर हे सारे काही अवलंबून असते.

सूर्यप्रकाशात सात रंग असतात आणि प्रत्येक रंगांची स्वत:ची वेगळी वेव्ह लेंग्थ असते. जेव्हा प्रकाश वायूमंडळातील छोट्या छोट्या कणांशी धडकतो, त्यावेळी ज्या रंगाचे वेव्ह लेंग्थ अधिक प्रभावीपणे आकाशात विखुरतात, त्याप्रमाणे आकाशाचा रंग दिसतो. या प्रक्रियेला स्कॅटरिंग असे म्हटले जाते.

Back to top button