पुण्यात आणखी 45 किमी मार्गांवर मेट्रो प्रकल्प; ‘या’ मार्गांचा समावेश | पुढारी

पुण्यात आणखी 45 किमी मार्गांवर मेट्रो प्रकल्प; 'या' मार्गांचा समावेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील पहिल्या टप्यातील 32 किमी मार्गांवरील मेट्रो प्रत्यक्षात साकारत असतानाच आता दुसर्‍या टप्यातील 44.7 किमी मार्गांवर मेट्रो प्रकल्प राबविण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. खडकवासला व्हाया स्वारगेट, हडपसर, खराडी आणि पौडफाटा ते वारजे माणिकबाग तसेच वनाज ते रामवाडी मार्गांवरील वाघोली आणि चांदणी चौकापर्यंतच्या विस्तारीत मार्गांचा यामध्ये समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच गरवारे ते रुबी हॉल आणि फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट या 16 किमी मार्गावरील मेट्रोचे उद्घाटन झाले. त्यानंतर आता पुणे महापालिकेने शहरातील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारीत करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने महामेट्रोकडून एचसीएमटीआरसह सात मार्गांवरील 80 किमी मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करून घेतला होता.

त्यामधील एचसीएमटीआरवरील निओ मेट्रो वगळून उर्वरित जवळपास 45.7 किमी मेट्रो मार्गांच्या मंजुरीचे दोन स्वतंत्र प्रस्ताव प्रकल्प विभागामार्फत स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. शुक्रवारी स्थायीच्या बैठकित प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांनी त्यावर शिक्का मोर्तब केला. आता मुख्यसभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव महामेट्रोमार्फत राज्य व केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला जाईल. हा संपूर्ण मार्ग जमिनीवरून (एलिव्हेटेड) जाणार आहे. ही मेट्रो प्रत्यक्षात साकारल्यानंतर पुणे शहराची मेट्रो सिटी अशी नवीन ओळख होऊ शकणार आहे.

मंजुरी देण्यात आलेले मेट्रो मार्ग

खराडी – हडपसर – स्वारगेट – खडकवासला (25.8 किमी )
एसएनडीटी ते वारजे (7 किमी)
रामवाडी ते वाघोली (11.2 किमी)
वनाज ते चांदणी चौक ( 1.5 किमी)

12 हजार 683 कोटींचा खर्च

स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या 44.7 किमी मेट्रो मार्गासाठी 10 हजार 866 कोटींचा खर्च येणार आहे. यामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मार्गांसाठी 3 हजार 609 कोटी तर खडकवासला ते स्वारगेट, हडपसर ते खराडी, पौडफाटा ते वारजे माणिकबाग या मार्गांसाठी 9 हजार 74 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. केंद्र व राज्य सरकार या निधीतून तसेच पीपीपीच्या माध्यमातून या खर्चाचे नियोजन असणार असूि, महापालिकेचा आर्थिक हिस्सा हा जमिनींच्या माध्यमातून असणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा आर्थिक बोजा महापालिकेवर पडणार नाही.

हेही वाचा

जगातील सर्वात मौल्यवान कंपनी Apple ला मोठा फटका! ३ ट्रिलियन डॉलरचा मुकूट गमावला

अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या दुसर्‍या विशेष फेरीसाठी 7 हजार 125 विद्यार्थी

इंजिनिअरिंग न करताही या पठ्ठयाने मिळवली गुगलमध्ये इतक्या मोठ्या पॅकेजची नोकरी

Back to top button