पुण्यात पाच घरफोड्यांत दहा लाखांचा ऐवज चोरीला | पुढारी

पुण्यात पाच घरफोड्यांत दहा लाखांचा ऐवज चोरीला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले घरफोड्यांचे सत्र काही केल्याने थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. चोरटे जोमात अन् पोलिस कोमात असेच काहीसे चित्र घरफोड्यांबाबत शहरात आहे. शुक्रवारी शहरातील विविध भागांत 5 ठिकाणी घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. खडकी भागातील बंद घराचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 98 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी मानसी संतोष देवकर (वय 34, रा. जुनी सांगावी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 2 ते 3 ऑगस्टदरम्यान घडली.

केदारीनगर वानवडी परिसरातील सदनिकेतून चोरट्यांनी 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घरफोडी करून लंपास केले. फिर्यादी या घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. याचा फायदा घेत चोरट्याने फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि 17 तोळे 3 ग्रॅम सोने असा 5 लाख 19 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अश्विनी चंद्रहास कट्रटा (वय 37, रा. केदारीनगर, वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तिसर्‍या घटनेत लोणी काळभोर परिसरातून एका घराचा कोयंडा तोडून 1 लाख 57 हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरांनी लंपास केले. या प्रकरणी तानाजी विश्वनाथ काळभोर (वय 62, रा. कदमवस्ती) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 24 जुलै रोजी दुपारी 1 ते रात्री 9 च्या दरम्यान घडली. चौथी घटना हडपसर भागात घडली असून, घराचा सेफ्टी तसेच मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 35 हजारांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला.

या प्रकरणी रेहाना झहिरउद्दीन शेख (वय 66, सासवड रस्ता, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 12 ते 24 जुलैदरम्यान घडली. पाचवी घटना ही कोंढवा भागात घडली असून, यात चोरट्याने घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे 82 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना 2 ऑगस्ट रोजी दुपारी 11 ते सायंकाळी 4 च्या दरम्यान घडली.

हेही वाचा

पुणे : साखर संग्रहालय हलविण्याच्या हालचाली?

सुगंधी वातावरणात झोपणे मेंदूसाठी ठरते लाभदायक

हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंग होणार सुरक्षित; सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांची माहिती

Back to top button