Gyanvapi Case | ज्ञानवापी मशिद परिसराचे ASI कडून सर्वेक्षण सुरु, कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात | पुढारी

Gyanvapi Case | ज्ञानवापी मशिद परिसराचे ASI कडून सर्वेक्षण सुरु, कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

वाराणसी, पुढारी ऑनलाईन : भारतीय पुरातत्व विभागाने (Archaeological Survey of India) वाराणसीतील ज्ञानवापी मशिद परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण आज शुक्रवारी सकाळी ७ वाजता सुरु केले. या पार्श्वभूमीवर मशिद परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. टीव्ही रिपोर्टनुसार, मशिद परिसरात ४१ अधिकारी हजर आहेत. सकाळी ७ वाजता सुरु झालेले सर्वेक्षणाचे काम दुपारी १२ पर्यंत चालणार आहे. पोलिस आयुक्त अशोक मुठा जैन आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी एस राजालिंगम मशिद परिसरात दाखल झाले आहेत. (Gyanvapi Case)

अलाहाबाद उच्च न्यायालयाने वाराणसी जिल्हा न्यायालयाचा आदेश कायम ठेवत आणि प्रस्तावित सर्वेक्षण न्यायाच्या हितासाठी आवश्यक आहे आणि दोन्ही बाजूंना त्याचा फायदा होईल, असा निर्णय दिल्यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मशिद परिसराचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.

हिंदू मंदिर तोडून त्यावर मशीद बांधली आहे का? याचा शोध घेण्यासाठी ज्ञानवापी मशिदीचे वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण केले जावे, असे आदेश जिल्हा न्यायालयाने पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले होते. वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या ज्ञानवापी मशिदीच्या एएसआय (ASI) सर्वेक्षणाच्या २१ जुलैच्या आदेशाला अंजुमन इंतेजामिया मशिद समितीने आव्हान दिले होते. ही याचिका काल गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली. (Gyanvapi Case) ज्ञानवापी मशीद परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करणे आवश्यक आहे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, ज्ञानवापी मशीद परिसराचे पुरातत्व विभागाचे सर्वेक्षण थांबवण्याची ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली. मुख्य न्यायमूर्ती प्रितिंकर दिवाकर यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना म्हटले की, “वाराणसी न्यायालयाने मशिद परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा दिलेला आदेश योग्य होता. न्यायाच्या दृष्टीने वैज्ञानिक सर्वेक्षण आवश्यक आहे.”
उच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिद परिसरात असलेल्या शिवलिंग सारखे दिसणाऱ्या संरचनेचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. ही संरचना किती जुनी आहे हे या सर्वेक्षणातून समोर येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने २४ जुलै रोजी ज्ञानवापी येथे सर्वेक्षणास प्रारंभ केला होता. ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समिती आणि अंजुमन इंतेजामिया मशिद यांनी वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाला स्थगिती दिली होती. वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात जावे, असेही निर्देशही दिले होते.

हे ही वाचा :

Back to top button