संभाजी भिडेंच्या चिपळूण सभेला परवानगी नाकारली | पुढारी

संभाजी भिडेंच्या चिपळूण सभेला परवानगी नाकारली

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपुरुष संत यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये करणारे संभाजी भिडे हे गुरूवारी (दि. ३) चिपळूणात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परंतू भिडेंच्या या दौऱ्याला राजकीय व सामाजिक संस्थांचा विरोध वाढला आहे. भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी बुधवारी (दि. २) ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भिडे यांच्या समर्थकांकडून देण्यात आली.

संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा ज्योतिबा फुले, साईबाबा यांच्यासह अनेक राष्ट्रपुरुषांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यावर येथे देखील पडसाद उमटू लागले असून विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी एकत्रीत येत त्यांच्या गुरूवारी (दि. ३) होणाऱ्या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला आहे. यामध्ये चिपळूण तालुका कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, कुणबी सेना, संभाजी ब्रिगेड, पूज्य गांधी प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विचार मंच आदी सामाजिक संस्थांचा समावेश आहे. त्यांनी बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन देत भिडे यांच्या दौऱ्यासह होणाऱ्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवागी न देण्याची मागणी केली. यावेळी राजमाने यांनी अजुनही संबंधीत कार्यक्रमाला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीदेखील शहरात कायदा, सुव्यस्था बिघडू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.

धारकरी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान या संघटनेच्या चिपळूण शाखेमार्फत संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत गुरूवारी सकाळी ११ वाजता चितळे मंगल कार्यालय येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबाबतचा संदेश सोशल मिडीयावर प्रसारीत करण्यात आला. मात्र भिडे यांच्याविषयी जनप्रक्षोभ वाढल्याने हा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Back to top button