तब्बल 45 हजार वर्षांपूर्वीची महिला ‘अशी’ दिसत होती! | पुढारी

तब्बल 45 हजार वर्षांपूर्वीची महिला ‘अशी’ दिसत होती!

प्राग : सध्याच्या झेक प्रजासत्ताकमधील एका गुहेत 1950 मध्ये पुरातत्त्व संशोधकांनी खोलवर दफन झालेली एक कवटी शोधून काढली. या कवटीचे वेगवेगळे दोन भाग सापडले होते. त्यामुळे सुरुवातीला संशोधकांना वाटले की, हे अवशेष दोन वेगवेगळ्या मानवांचे असावेत. मात्र, अनेक दशकांनंतर संशोधकांनी या कवटीच्या सहाय्याने जनुकीय अनुक्रम तयार केल्यावर ही कवटी एकाच व्यक्तीची असल्याचे आढळले. ही व्यक्ती म्हणजे तब्बल 45 हजार वर्षांपूर्वीची एक महिला होती.

संशोधकांनी या महिलेला ‘झ्लॅटी कुन’ असे नाव दिले. झेक भाषेत या शब्दाचा अर्थ ‘सोनेरी अश्व’ असा होतो. या महिलेच्या डीएनएचेही विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये आढळले की, तिच्या जीनोममध्ये केवळ तीन टक्के नियांडरथल मानवाचा अनुवंश आहे. निएंडरथल प्रजातीच्या मानव समूहाशी संबंध आलेल्या आधुनिक मानवांपैकी ती होती.

सुरुवातीच्या काळातील आधुनिक मानवांच्या समूहाचा ती एक भाग होती. त्यामुळे जीनोम सिक्वेन्सिंग केलेली ती आधुनिक मानवजातीमधील सर्वात प्राचीन मानव ठरली आहे. या महिलेच्या जनुकीय संरचनेबाबतची बरीच माहिती समजलेली असली, तरी ती नेमकी कशी दिसत होती, हे समजलेले नव्हते; मात्र आता तिचा चेहरा कसा होता, याबाबतचे एक कल्पनाचित्र तयार करण्यात आले आहे. ते तयार करण्यासाठी संशोधकांनी तिच्या कवटीचे जे सीटी स्कॅन करण्यात आले होते, त्याच्या डाटाचा वापर केला.

Back to top button