वीस वर्षांमध्ये ५६ टक्के समुद्र झाला हिरवट! | पुढारी

वीस वर्षांमध्ये ५६ टक्के समुद्र झाला हिरवट!

न्यूयॉर्क : संशोधकांचे म्हणणे आहे की, वीस वर्षांमध्ये 56 टक्के समुद्राचा रंग बदलला आहे. तो निळ्या रंगापासून हिरव्या रंगात परिवर्तित होत आहे. त्याचा परिणाम सागरी जीवांबरोबरच सी-फूडवर अवलंबून राहणार्‍या लोकांवरही होऊ शकतो. हवामान बदलामुळे हे घडत असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे. यामुळे समुद्रातील कार्बन डायऑक्साईड घटत असून सागरी जलचरांना धोका निर्माण झाला आहे.

संशोधकांनी म्हटले आहे की, हवामान बदलामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर फायटोप्लँक्टन म्हणजेच समुद्रात आढळणारे छोट्या वनस्पतींसारखे दिसणारे जीव वाढले आहेत. सागरी जीवनाला ते नियंत्रित करीत असतात. या फायटोप्लँक्टनमध्ये झाडा-झुडपांप्रमाणेच हिरवे क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्य असते. त्यामुळे पाण्याचा पृष्ठभागही हिरवा दिसत आहे.

संशोधकांच्या मते समुद्राचा रंग बदलणे ही एक धोक्याची घंटा आहे. फायटोप्लँक्टन वाढल्याने समुद्रात ‘डेड झोन’ वाढू लागला आहे. या ‘डेड झोन’मध्ये सागरी जीव श्वास घेऊ शकत नाहीत व ते मरून जातात. समुद्रांचा रंग बदलत असल्याचा खुलासा 2002 ते 2022 च्या दरम्यान सॅटेलाईट डेटामधून झाला आहे. या डेटानुसार 56 टक्के समुद्र निळ्या रंगापासून हिरव्या रंगात बदलला आहे. हवामान बदलामुळे महासागरांमध्ये बदल होत आहेत. महासागर हे जगातील 25 टक्के कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतात. हवामान बदलामुळे तापमान वाढत आहे. त्यामुळे समुद्राचे पाणीही वेगाने उष्ण होत आहे. त्यामुळे कोरल ब्लिचिंग होऊन प्रवाळांचीही हानी होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button