टीम इंडियाची मानसिकता छोटी : व्यंकटेश प्रसाद | पुढारी

टीम इंडियाची मानसिकता छोटी : व्यंकटेश प्रसाद

बंगळूर, वृत्तसंस्था : दुसर्‍या वन डे सामन्यात तर विंडीजने भारतीय संघाच्या सर्व मर्यादा उघड्या पाडल्या. भारताचा 6 विकेटस् राखून पराभव करत विंडीजने मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आणली. भारताच्या या पराभवानंतर माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने तर टीम इंडियाला बोचर्‍या शब्दात झापले. ‘पैसा आणि पॉवर असूनही आपल्याला छोट्या मोठ्या यशात समाधान मानायची सवय लागली आहे. छोट्या मानसिकतेमुळे आपण एक चॅम्पियन टीम बनण्याच्या खूप दूर आहोत,’ असे व्यंकटेश प्रसाद याने म्हटले आहे.

व्यंकटेश प्रसादच्या मते भारताने आपल्या वृत्तीत आणि द़ृष्टिकोनात बदल करून मोठे यश मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे. तो आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये म्हणतो की, सर्वच संघ जिंकणार्‍यासाठीच खेळत असतात. टीम इंडिया देखील जिंकण्यासाठीच खेळते. मात्र, कालानुरूप त्यांचा द़ृष्टिकोन आणि वृत्ती खराब कामगिरीला कारणीभूत आहे.’

पाठोपाठ ट्विट करत प्रसाद म्हणाला की, भारताला बांगला देश, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका गमवावी लागली. टीम इंडियाने गेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये सुमार दर्जाची कामगिरी केली. आपण ना इंग्लंडसारखा उत्साही संघ आहोत, ना ऑस्ट्रेलियासारखा आक्रमक संघ आहोत.

काय म्हणाला व्यंकटेश प्रसाद?

भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद , ’कसोटी क्रिकेटचा अपवाद वगळता इतर दोन फॉरमॅटमधील टीम इंडियाची कामगिरी ही अत्यंत सुमारच राहिली आहे.’

Back to top button