Tajpur landslide : ताजपूरजवळ दरड कोसळली; २९ कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या सुचना | पुढारी

Tajpur landslide : ताजपूरजवळ दरड कोसळली; २९ कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या सुचना

सुयोग आंग्रे

रायगड : अलिबाग तालुक्यातील ताजपुर गावानजीक असणाऱ्या टेकडीवरील गुरूवारी रात्री (Tajpur landslide) दरड कोसळली. रामराज बाजूने येणाऱ्या खारभूमी विभागाच्या संरक्षक बंधाऱ्याच्या सामोर असणाऱ्या टेकडीचा काही भाग भूस्खलन झाल्याने त्याठिकाणी असणारे चीदबा देवी मंदिर आणि विहिरीला चिखलाच्या मलब्याने घेरले आहे. दरड कोसळली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या दरडीच्या वरच्या बाजूला तब्बल 29 घरे आहेत. या घरांमध्ये असणाऱ्या कुटुंबांतील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

इर्शाळवाडी (Tajpur landslide)  येथील दरड कोसळल्याची घटना ताजी असताना दुसरी घटना घडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात असणाऱ्या 103 गावांमध्ये प्रशासनाने खबरदारीच्या सूचना देऊन नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. जिल्ह्यात आता पर्यंत दरडग्रस्त गावांमधील सुमारे अडीच हजार कुटुंबातील ८ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. दरडग्रस्त गावांमध्ये प्रशासनाचे तलाठी , ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांची करडी नजर आहे. या संभाव्य दरड ग्रस्त गावांसाठी पालक म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी या गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी सुरुवात केली आहे.

अलिबाग तालुक्यात असणाऱ्या संभाव्य दरड ग्रस्त 7 गावांमध्ये ताजपूर गावाचा समावेश आहे. ताजपूर गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. या गावाच्या डोंगराच्या उतारावर नागरिकांनीं आपली घरे बांधलेली आहेत. डोंगराच्या वर आणि डोंगराच्या उतारावर नागरिकांनी आपल्या घरांची मांडणी केली आहे. घरे बांधताना केलेले खोदकाम यामुळे कधीही भूस्खलन होऊ शकते. त्यामुळे अलिबाग तहसील प्रशासनाने कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या नोटीस पाठविल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी या गावात असाच डोंगराचा काही भाग कोसळला होता. त्यावेळी देखील महसूल प्रशासनाने येथील नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला होता. गुरूवारी रात्रीच्या सुमारास गाव झोपलेले असताना ताजपूर गावाच्या खाली असणाऱ्या चिदबादेवी मंदिर आणि पिण्याच्या पाण्याची विहीर असणाऱ्या वरच्या बाजूला असणारी दरड कोसळली. या दरडीमध्ये जीवित हानी झालेली नाही, परंतु गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तुटली आहे. पाण्याच्या टाकीजवळ किमान सात फुटांचा चिखलाचा मलबा पसरला आहे. त्या टाकीच्या खाली असणाऱ्या विहिरीला देखील दरडीने वेढा दिला आहे. काही दरडीचा भाग शेतात उतरून भात पिकाचे नुकसान झाले आहे.

अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी गावातील ग्रामस्थांना नातेवाईक किंवा रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. स्थलांतरित होणाऱ्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आवर्जून ग्रामस्थांना सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत अलिबाग गट विकास अधिकारी शुभांगी नाखले, सहाय्यक गट विकास अधिकारी मंगेश पाटील, रामराजचे तलाठी प्रदीप थोरात , मालाडे तलाठी एस. एम. दफेदार , चिंचोटी तलाठी एस. एस. कांबळे , ताजपूर ग्रामस्थ मोहन झावरे, संतोष झावरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button