Irshalgad Landslide : रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली; ५ जणांचा मृत्यू, मदतकार्य युद्धपातळीवर | पुढारी

Irshalgad Landslide : रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली; ५ जणांचा मृत्यू, मदतकार्य युद्धपातळीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : रायगडमधील खालापूर तालुक्यातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये १५ ते २० मुलांचाही समावेश आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले असून आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

Irshalgad Landslide

गावात सुमारे ६५ घरे होती त्यातील जवळपास २५ ते ३० घरांवर दरड कोसळल्याने जमीन उद्ध्वस्त झाली आहेत. आतापर्यंत २५ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये २-३ लहान मुलांचाही समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दुर्घटना बचावासाठी जाताना हृदयविकाराच्या धक्क्याने एका जवानाचा मृत्यू झाला असल्याचीही माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल

खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावावर दरड कोसळली आहे. वसाहतीत आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर ही आदिवासी वाडी आहे. सध्या घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत मंत्री गिरीष महाजन, उदय सामंत, दादा भूसेही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल; बचावकार्य सुरू

कोकणात पावसामुळे हाहाकार उडाल्याची परिस्थीती आहे. जोरदार पाऊस, अंधार आणि निसरडी वाटेमुळे बचाव पथकांना दुर्घटनास्थळी पोहचण्यात अडचणी निर्माण होत होत्या. सध्या एनडीआरफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आले आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान, हेलिकॉप्टरद्वारे रेस्कू ऑपरेशन केले जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

Irshalgad Landslide

इर्शाळवाडी दुर्घटनेसाठी नियंत्रण कक्ष तयार

इर्शाळवाडी येथे एनडीआरफचे पथक दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपेरेशन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान, घटनास्थळापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या चौक येथे तात्पुरते नियंत्रण कक्ष तयार केले आहे. ग्रामस्थांनी मदतीसाठी 8108195554 या क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Irshalgad Landslide

Back to top button