अहमदनगर : काँग्रेसने ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवले | पुढारी

अहमदनगर : काँग्रेसने ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात असलेल्या काँग्रेसच्या सरकारने देशातील ओबीसींना आरक्षण देण्याचा विचारही केला नव्हता. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छा नव्हती. मात्र, 1977 साली जेव्हा जनसंघ केंद्रात सत्तेत सहभगी झाला. त्यावेळी ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. 1990 साली पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजप सत्तेत आल्यावर मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारून ओबीसी समाजाला आरक्षण दिले गेले. 1952 ते 90 पर्यंत ओबीसीला आरक्षणापासून काँग्रेसने वंचित ठेवले होते, असा आरोप भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले.
नगर भाजप ओबीसी आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यास प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, विधानसभा प्रभारी महेंद्र गंधे, प्रदेश सरचिटणीस विनोद ब्राह्मणकर, प्रदेश उपाध्यक्ष विनोद दळवी, सरचिटणीस युवराज पोटे, ज्ञानेश्वर काळे, तुषार पोटे, नगरसेवक प्रदीप परदेशी, धनंजय जाधव, संतोष रायकर, अनुराज आगरकर, रेखा विधाते, बाळासाहेब भुजबळ आदी उपस्थित होते.
संजय गाते म्हणाले, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील ओबीसी समजासाठी वेगळ्या मंत्रालयाची स्थापना केली. त्याद्वारे अनेक लाभाच्या योजना पूर्ण ओबीसी समाजासाठी सुरू केल्या आहेत. देशाच्या इतिहासात ओबीसी मंत्रालय स्थापन करून भाजपने पूर्ण ओबीसी समाजाचे हित पहिले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता फडणवीसांनी मराठा समाजालाही आरक्षण दिले होते. मात्र, आघाडी सरकारला ते टिकवता आले नाही.
महेंद्र गंधे म्हणाले, नगर शहरात भाजपा ओबीसी आघाडीचे काम उत्तमपणे सुरू आहे. नगर शहरातून बरेच ओबीसी समाजाचे लोकप्रतिनिधी झाले आहेत. शहरातील ओबीसी समाज कायम भाजपाच्या मागे उभा असतो. किशोर डागवाले जेव्हा प्रदेश उपाध्यक्ष झाले तेंव्हापासून त्यांनी ओबीसी समाजाचे चांगले संघटन केले आहे. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काळे यांनी केले. बाळासाहेब भुजबळ यांनी आभार मानले. यावेळी सुमित इप्पलपेल्ली, ओंकार लेंडकर, शरद मेहेत्रे, वैशाली बुधवंत, सुनील भिंगारे, नरेंद्र कुलकर्णी, बाबासाहेब सानप, सचिन पावले, श्रीकांत फंड आदी उपस्थित होत.
हेही वाचा

Back to top button