बर्फाचे ‘हे’ विवर वितळले तर जगाला धोका! | पुढारी

बर्फाचे ‘हे’ विवर वितळले तर जगाला धोका!

मॉस्को : रशियामधून काही दिवसांपूर्वीच एक फुटेज समोर आले होते जे जगभरातील लोकांना हैराण करणारे आहे. जगावर हवामान बदलाचा, तापमानवाढीचा कसा परिणाम होत आहे हे दाखवणारे ते फुटेज होते. या ड्रोन फुटेजमध्ये दिसून येते की रशियातील ‘बटागाइका क्रेटर’ असे नाव असलेले विवर किंवा विशाल खड्डा आता वितळू लागला आहे. हे एक पर्माफ्रॉस्ट क्रेटर म्हणजेच दीर्घकाळापासून बर्फाचा जाड स्तर धारण केलेला खड्डा आहे. रशियाच्या पूर्व भागात असलेला हा एक किलोमीटर लांबीचा भाग जगातील सर्वात मोठे ‘पर्माफ्रॉस्ट क्रेटर’ म्हणून ओळखला जातो. तो वितळला तर संपूर्ण जगालाच धोका निर्माण होऊ शकतो.

जगाच्या उत्तर तसेच इशान्य भागामध्ये हवामान बदलाचे घातक परिणाम दिसून येत आहेत. रशियातील हे पर्माफ्रॉस्ट क्रेटर सन 1960 च्या दशकात आसपासचे जंगल साफ झाल्यानंतर बनण्यास सुरू झाले होते. असे ठिकाण शून्य अंश सेल्सिअस तापमानात तयार होत असते. पर्माफ्रॉस्ट वितळत असल्याने तेथील जमीनही खचू लागली आहे. त्यामुळे तिथे एक मोठा खड्डा तयार झाला आहे. ‘नासा’च्या माहितीनुसार पर्माफ्रॉस्ट कोणतीही जमीन असते जी सातत्याने किमान दोन वर्षांपर्यंत शून्य अंश सेल्सिअस तापमानात पूर्णपणे गोठून जाते. हे स्थायी रूपाने गोठलेले मैदान बर्फामुळे एकत्र झालेली माती, खडक आणि वाळू यांच्या मिलाफातून बनते. उत्तर आणि दक्षिण ध —ुवाजवळ असे पर्माफ्रॉस्ट असणे ही एक सर्वसामान्य बाब आहे. विशेषतः उत्तर गोलार्धाची सुमारे एक चतृर्थांश जमिनीत पर्माफ्रॉस्ट आहे.

बटागाइका क्रेटरजवळील स्थानिक लोक या एक किलोमीटर लांबीच्या विशाल ठिकाणाला ‘पाताळाचे प्रवेशद्वार’ असे म्हणतात. हा खड्डा सन 1960 च्या दशकात सर्वप्रथम दिसून येऊ लागला. अशी स्थायी रूपाने गोठलेली जमीन हजारो वर्षांपासून कार्बन सिंकचे काम करते. जर तेथील बर्फ वितळू लागला तर मोठ्या प्रमाणात शोषून घेतलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडू लागते. त्यामुळे जागतिक तापमानवाढीची समस्या अधिक उग्र बनू शकते. कार्बन आणि मिथेनसारखे अनेक गीगा-टन वायूंबरोबरच हजारो वर्षांपासून सुप्तावस्थेत असलेले विषाणू व जीवाणूही बाहेर पडू लागतील. त्यामुळे संपूर्ण जगालाच धोका निर्माण होऊ शकतो.

Back to top button