‘सरहद’ची ‘सद्भावना ज्योत’ देशभर प्रज्वलित व्हावी : डॉ. प्रतापसिंह जाधव | पुढारी

‘सरहद’ची ‘सद्भावना ज्योत’ देशभर प्रज्वलित व्हावी : डॉ. प्रतापसिंह जाधव

पुणे, पुढारी वृत्तसेवा : देशातील जवानांच्या कल्याणासाठी तसेच तरुण पिढीत देशप्रेम वाढविण्यासाठी सरहद संस्थेने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. तुम्ही लावलेली ही ‘सद्भावना ज्योत’ अशीच तेवत राहो अन् संपूर्ण देशभरात प्रज्वलित होवो, अशी भावना दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी ‘कारगिल गौरव’ पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केली.

कारगिल युद्धाला येत्या 26 जुलै रोजी 24 वर्षे पूर्ण होत आहेत. शहरातील सरहद संस्थेच्या वतीने युद्धाचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्त देशातील जवानांसाठी मोठे योगदान देणार्‍या व्यक्तिमत्त्वांचा हृद्य सत्कार शनिवारी एस. एम. जोशी सभागृहात झाला. यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव, आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त ले. जनरल डॉ. माधुरी कानिटकर, जम्मू-काश्मीरचे सामाजिक कार्यकर्ते शहनवाज शाह यांना ‘राष्ट्रीय कारगिल गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कर्दळे यांचा ‘मरणोत्तर’ पुरस्कार त्यांचे सहकारी प्रसन्नकुमार केसकर यांनी स्वीकारला. कर्नल वेंबू शंकर हे या सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी पाठविलेल्या संदेशाची चित्रफीत दाखविण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. फोर्स मोटर्सचे चेअरमन अभय फिरोदिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

असे झाले सियाचीनला रुग्णालय

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांचे कौतुक केले. दै. ‘पुढारी’ने सियाचीन येथे भारतीय जवानांसाठी 1999 साली रुग्णालय कसे बांधले, त्याचा रोमांचक प्रवास सर्वांना सांगितला. ते म्हणाले की, सियाचीन ही जगातील सर्वात उंच ठिकाणी असणारी युद्धभूमी आहे. तेथे उणे 50 अंश सेल्सिअस इतके तापमान असते. त्या ठिकाणी कोणत्याही वैद्यकीय सुविधा मिळत नव्हत्या. तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना मी फोन केला. त्यांनी सांगितले, तेथे जवानांना वैद्यकीय उपचार मिळणे खरोखर अवघड आहे. सरकारी यंत्रणेतून काम होण्यास वेळ लागेल. अशावेळी मी त्यांना सांगितले की, दै. ‘पुढारी’ आणि आमचे वाचक यांच्या मदतीने रुग्णालय उभारू इच्छितो. तुम्ही खर्चाचा अंदाज पाठवा. त्यावर जॉर्ज यांनी होकार दिला. महिनाभरात दै. ‘पुढारी’ने अडीच कोटी रुपये गोळा केले अन् अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असे शंभर खाटांचे रुग्णालय सियाचीनसारख्या अतिशय उंच ठिकाणी उभे राहिले. त्यावेळी पारनाईक हे नौदलाचे प्रमुख होते. त्यांनीही याकामी खूप मेहनत घेतली.

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी या रुग्णालयाला भेट दिली होती. या ठिकाणी 45 हजार जवानांनी उपचार घेतल्याचे त्यांनी पत्राने मला कळविले होते, अशी आठवण डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

निवृत्तीनंतरचे जीवन जवानांसाठी : चंद्रकांत पाटील

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे. मी तिच्याजवळ निदान आज तरी असावे, अशी तिची भावना साहजिकच होती; पण मी तिला या कार्यक्रमाची कल्पना दिली, तेव्हा तिनेही आनंदाने होकार दिला. त्यामुळे मी आज तिच्या वाढदिवशी संकल्प करतो की, मी जेव्हा केव्हा राजकारणातून निवृत्त होईन तेव्हा पुढचे जीवन जवानांच्या सेवेत समर्पित करीन.

‘सरहद’ला फिरोदियांनी दिली एक कोटीची देणगी

अध्यक्षीय भाषणात अभय फिरोदिया यांनी सरहद संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले की, ही संस्था गेली अनेक वर्षे सैनिकांसाठी काम करीत आहे. त्यांच्या याकामी मी शुभेच्छा देतो व संस्थेला 1 कोटीची देणगी जाहीर करतो. यावेळी संकेत बियाणी ज्वेलर्स यांच्या वतीने देशप्रेमाच्या संकल्पनेवर तयार केलेली चांदीची अंगठी सर्व पुरस्कारार्थींना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले. शैलेश वाडेकर यांनी आभार मानले.

मोदींसारखा कणखर नेता आहे म्हणून…

डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, युक्रेनचे युद्ध सुरू झाले तेव्हा तेथील लोक आजूबाजूच्या देशांमध्ये गेले; पण भारतात युद्ध झाले तर आपण कुठे जाणार? पाकिस्तान, बांगला देश की चीन? आपल्याला शत्रुराष्ट्रांनीच वेढलेले आहे. अशावेळी मला पंतप्रधान मोदींचे कौतुक करावेसे वाटते. इतका कणखर नेता आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. नितीन गडकरी यांनी देशभर सुंदर रस्त्यांचे जाळे बनवले. त्या मोठ्या रस्त्यांवर कुठेही विमान उतरवता येते, त्यामुळे आपली सुरक्षा यंत्रणा मजबूत आहे.

जवान, डॉक्टर, शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची : डॉ. कानिटकर

मी सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल होते. डॉक्टरही होते आणि आता आरोग्यविज्ञान विद्यापाठाची कुलगुरू आहे. आपल्या देशात जवान, डॉक्टर अन् शिक्षक खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मी भाग्यवान आहे; कारण या तिन्ही भूमिका मला बजावता आल्या. त्या काळात फार कमी महिला सैन्यदलात होत्या; पण आता मोठ्या संख्येने मुली ‘एनडीए’मध्ये भरती होत आहेत. ही खूप अभिमानास्पद बाब आहे, अशी भावना आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केली.

…अन् तो शहीद झाला

डॉ. कानिटकर म्हणाल्या की, हा पुरस्कार मी जवान, डॉक्टर अन् शिक्षकांना समर्पित करते. तसेच माझ्या मुलासारखाच असणारा विद्यार्थी अंशुमन सिंग यालादेखील समर्पित करते. अंशुमन हा नुकताच शहीद झाला. देशाचे रक्षण करताना लोकवस्तीत लागलेल्या आगीतून त्याने अनेकांचे प्राण वाचविले. शेवटी कोणी राहिले तर नाही ना? हे बघण्यास तो पुन्हा आगीच्या ठिकाणी गेला तेव्हा त्याच्या अंगावर भिंत पडली अन् तो शहीद झाला. ही आठवण सांगताना डॉ. कानिटकर यांचे डोळे पाणावले.

Back to top button