रायगड : एनडीआरएफच्या टीमने वाचवले १० दिवसाच्या बाळसह ६ जणांचे जीव | पुढारी

 रायगड : एनडीआरएफच्या टीमने वाचवले १० दिवसाच्या बाळसह ६ जणांचे जीव

महाड, पुढारी वृत्तेसवा : पोलादपूर तालुक्यातील हावरे येथील रस्त्यावर महिला प्रसुती होऊन रुग्णवाहिकेतून घरी परतत होती. मात्र, पुढे ती पुराच्या पाण्यात अडकली. दरम्यान, एनडीआरएफच्या टीमने प्रसुती झालेली महिला आणि तिचे १० दिवसांचे बाळ आणि इतर ६ जणांचे जीव वाचवले आहेत. एनडीआरएफच्या पथकाने बोटीने घरापर्यंत सुरक्षितरित्या पोचवून त्यांचे जीव वाचवले आहेत.

महाड व पोलादपूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, काळ व गांधारी नदीला पूर येऊन पुराचे पाणी सर्वच रस्त्यावर आल्याने अनेक मार्ग बंद पडले आहेत. पोलादपूर तालुक्यातील हावरे येथील समिधा संदीप जाधव(वय २५) यांच्या प्रसुतीनंतर त्यांना व १० दिवसाचे बाळ, स्वाती गणेश रातारेस (३५), रोहीणी गणेश खेडेकर (२४) गार्गी जाधव (१०) वियान जाधव(४) यांना रुग्णवाहिकेतून घरी सोडत असताना ही रुग्णवाहिका भोराव जवळ पाण्यात अडकली.

ही माहिती एनडीआरएफच्या पथकाला समजताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून १० दिवसाचे बाळासह त्याची आई व इतरांना बोटीने सुरक्षितपणे हावरे येथील घरी सोडून त्यांचे जीव वाचवले. एनडीआरएफच्या या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये इन्स्पेक्टर अंकीत, सुजीत पासवान यांसह त्यांचे सहकार्‍यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

Back to top button