विजयकुमार देशमुखांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून भास्कर जाधवांचा युटर्न | पुढारी

विजयकुमार देशमुखांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावरून भास्कर जाधवांचा युटर्न

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : एका कथित महिलेचे शोषण करण्यात सोलापूर जिल्ह्यातील काही आमदार आणि काही खासदार सहभागी असल्याचा आरोप प्रसारमाध्यमांसमोर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. यावेळी त्यांनी नजरचुकीने भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख हेही त्यामध्ये सहभागी असल्याचा उल्लेख केला. यानंतर आमदार विजयराव देशमुख यांनी जाधव यांनी या प्रकरणाचा खुलासा करावा, अशी मागणी विधानपरिषदेत केली. त्यावर खुलासा देताना आमदार भास्कर जाधव यांनी युटर्न घेतला आहे. ‘हे’ विजयकुमार देशमुख ‘ते’ नव्हे, मी ‘आमदार’ विजयकुमार देशमुख असा उल्लेख केलेला नाही, असे जाधव यांनी म्हटले आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी किरीट सोमय्या कथित व्हिडिओ प्रकरण प्रचंड गाजले. राज्यभर महाविकास आघाडीकडून निदर्शने करण्यात आली. माध्यमांनी आमदार भास्कर जाधव यांना महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी अनेकांची नावे घेतली. अद्याप संबंधीतांवर कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रतिसवाल त्यांनी केला. याप्रसंगी बोलताना त्यांनी सोलापूरचे विजयकुमार देशमुख या नावाचा देखील उल्लेख केला होता. यावर आमदार विजय देशमुख यांनी सभागृहामध्ये, ‘भास्कर जाधव यांनी माझी बदनामी केली’ असा मुद्दा उपस्थित करून त्यांना समज द्यावी, अशी मागणी केली आहे.

त्यावर खुलासा करताना भास्कर जाधव म्हणाले, ‘आपण आमदार किंवा माजी मंत्री विजयकुमार देशमुख असा काहीही उल्लेख केलेला नाही. या प्रकरणावर विधानसभेच्या आवारात आम्ही दोघांनी मिळून चर्चा केली. एकत्र चहाही घेतला. माध्यमांसमोर जाऊन मी या संदर्भात खुलासा करतो, असेही ठरले. पण तरीही विजय देशमुख यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर मतदार संघातून भास्कर जाधव यांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आज विधानसभेत भास्कर जाधव या घडल्या प्रकारावर खुलासा करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Back to top button