कोल्हापूर जिल्ह्यात 7 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात 7 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत मंगळवारी धुवाँधार पाऊस झाला. शहर आणि परिसरातही पावसाचा जोर होता. जिल्ह्याच्या अनेक भागांत दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांपैकी 7 धरणांच्या परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी शहर आणि परिसरात दिवसभर थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषत: धरण क्षेत्रांत पावसाचा जोर अधिक होता. सकाळपासूनच पाटगाव, कुंभी, तुळशी आदी धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस कोसळत होता. दुपारनंतर वाढलेला पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता.

मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. घटप्रभा धरण परिसरात 147, तर पाटगांव परिसरात 143 मि.मी. पाऊस झाला. राधानगरीत 67, कडवीत 65, जांबरेत 68, कोदेत 92, तर चित्रीत 88 मि.मी. पाऊस झाला. सकाळनंतरही जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रांत पावसाचा जोर वाढला असून, मंगळवारी सकाळी सात ते दुपारी चार या केवळ आठ तासांत पाटगावमध्ये 135 मि.मी., घटप्रभेत 103 मि.मी., कुंभीत 65 मि.मी. पाऊस झाला. पावसाचा जोर वाढल्याने धरणांत येणार्‍या पाण्याची आवकही वाढत आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढत आहे. राधानगरी धरण मंगळवारी 56 टक्के भरले.

जिल्ह्यात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सरासरी 16.6 मि.मी. पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात 39.2 मि.मी. इतका झाला. गगनबावड्यात 32.1 मि.मी., भुदरगडमध्ये 31.7 मि.मी., शाहूवाडीत 24.2 मि.मी., राधानगरीत 22.2 मि.मी., आजर्‍यात 20.3 मि.मी. पाऊस झाला. पन्हाळ्यात 18.3 मि.मी., करवीरमध्ये 10.2 मि.मी., कागलमध्ये 10, तर गडहिंग्लजमध्ये 10.1 मि.मी. पाऊस झाला. हातकणंगलेत 5.2, तर शिरोळमध्ये 2.6 मि.मी. पावसाची नोंद झाली.

पावसाने पंचगंगेच्या पातळीतही वाढ होत असून, दिवसभरात पाणी पातळीत अर्ध्या फुटाने वाढ झाली. सकाळी 17.1 फुटांवर असणारी पाणी पातळी दुपारी 4 वाजता 17.7 फुटांवर गेली होती. राजाराम बंधार्‍यातून सध्या 8 हजार 832 क्यूसेक पाण्याचा विसर्ग पुढे सुरू आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, शिंगणापूर, रूई, सुर्वे आणि इचलकरंजी हे पाच बंधारे पाण्याखालीच आहेत.

Back to top button