‘वंदे भारत’च्या तिकीटदरात २५ टक्के सवलत नाहीच | पुढारी

‘वंदे भारत’च्या तिकीटदरात २५ टक्के सवलत नाहीच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई- सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत गाड्यांची प्रवासी संख्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शासनाने दिलेली 25 टक्के तिकीटदरातील सवलत या दोन्ही गाड्यांना सध्यातरी लागू होणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. मुंबईतून या दोन्ही गाड्यांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही गाड्या फुल्ल भरून जात आहेत. नुकताच शासनाने ज्या गाड्यांना 50 टक्क्यांपेक्षा कमी प्रवाशांचा प्रतिसाद आहे, त्या गाड्यांच्या तिकीटदरात 25 टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु, या दोन्ही गाड्यांना चांगला प्रतिसाद असल्यामुळे या गाड्यांच्या तिकीटदरात 25 टक्के सवलत सध्यातरी दिली जाणार नसल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले.

असे आहे वंदे भारत गाड्यांचे वेळापत्रक
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज सकाळी 06.20 वाजता सुटते आणि त्याच दिवशी 11.40 वाजता साईनगर शिर्डीला पोहोचते. तर साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस साईनगर शिर्डी सायंकाळी 05 वाजून 25 मिनिटांनी सुटते आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचते. दरम्यान ही गाडी दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबा घेते. मुंबई- सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दररोज सायंकाळी 4 वाजून 05 मिनिटांनी सुटते आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी सोलापूरला पोहोचते. सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस दररोज सोलापूर येथून सकाळी 06 वाजून 05 मिनिटांनी सुटते आणि त्याच दिवशी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचते. दरम्यान ही गाडी दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथे थांबा घेते.

 

नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई- सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत गाड्यांची प्रवासी संख्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शासनाने दिलेली 25 टक्के तिकीटदरातील सवलत या दोन्ही गाड्यांना लागू होणार नाही.
                 – डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

25 टक्के तिकीटदरात सवलत देणे आमच्या हातात नाही. रेल्वे बोर्डाकडूनच याबाबतच्या सवलतीचे निर्णय होतात. त्यामुळे सोलापूर वंदे भारत रेल्वेच्या 25 टक्के तिकीटदरासंदर्भात वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय होतील.
                         – डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, पुणे विभाग

हेही वाचा : 

सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करणाराही मेसेजमधील मजकुराला तेवढाच जबाबदार : उच्‍च न्‍यायालय

धक्कादायक ! स्कूल बसमध्येही आडवी आली जात !

Back to top button