धक्कादायक ! स्कूल बसमध्येही आडवी आली जात ! | पुढारी

धक्कादायक ! स्कूल बसमध्येही आडवी आली जात !

भिगवण : पुढारी वृत्तसेवा :  भिगवण भागात लहान मुलांच्या शालेय बसमध्ये ‘जात’ आडवी आल्याचा धक्कादायक प्रकार पाचवीतील अल्पवयीन मुलीबरोबर घडला आहे. यावरून एका शिक्षिकेविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक बोलल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपाली मारुती कचरे (रा. बंडगरवाडी, पोंधवडी, ता. इंदापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे.
‘ती पारध्याची आहे, तिच्यासोबत बसू नका,’ असे संबंधित शिक्षिकेने म्हटल्याने मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 11) घडला असून, बुधवारी (दि. 12) भिगवण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, भिगवण भागात एका खासगी शाळेतील बसमध्ये हा प्रकार दुपारी शाळा सुटल्यानंतर घडला आहे. संबंधित शिक्षिका व लहान मुले नेहमीप्रमाणे या बसमध्ये होते. या वेळी संबंधित शिक्षिका पाचवीतील त्या अल्पवयीन मुलीला ‘हिच्यासोबत कोणी बसू नका,’ असे म्हणाली. त्यावर संबंधित पीडित मुलीने ‘असे म्हणू नका, गप्प बसा,’ असे म्हणताच त्या शिक्षिकेने उलट पीडित मुलीलाच धमकावत ‘तूच गप्प बस,’ असे धमकाविले. याबाबत पालकांनी याची शहानिशा करून चौकशी केली व आपल्या मुलीला जातीवरून बर्‍याच वेळा असे टोमणे मारले जात असल्याचे कळले. त्यावरून मुलीच्या आईने भिगवण पोलिसांत फिर्याद दाखल करण्याचा मंगळवारी प्रयत्न केला. परंतु, प्रकरण मिटविण्यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव आणण्यात आला. अखेर बुधवारी पीडित मुलीच्या आईने उपअधीक्षकांची भेट घेतल्यानंतर बुधवारी पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस करीत आहेत.

हे ही वाचा :

अंतराळात कसे कापतात केस?

पैशांची उधळपट्टी केली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला !

 

Back to top button