50 कोटी वर्षांपूर्वीची मांजराएवढी कोळंबी! | पुढारी

50 कोटी वर्षांपूर्वीची मांजराएवढी कोळंबी!

वॉशिंग्टन : तब्बल 50 कोटी वर्षांपूर्वी समुद्रात कोळंबीची अनोखी प्रजाती अस्तित्वात होती. या प्रजातीला ‘अ‍ॅनोमॅलोकॅरिस कॅनाडेन्सिस’ असे नाव दिलेले आहे. तिला ‘कॅनडाची असामान्य कोळंबी’ असेही म्हटले जाते. या कोळंबीचा आकार पाळीव मांजराइतका मोठा होता. तिचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या तोंडावर असलेले दोन काटे. या काट्यांचा वापर ती भक्ष्याला ‘पंक्चर’ करण्यासाठी करीत होती, असे आता संशोधकांनी म्हटले आहे.

विशेषतः कठीण कवचाच्या भक्ष्याच्या शरीरात टोचण्यासाठी या काट्यांचा वापर होत असल्याचे पूर्वी मानले जात होते. मात्र, ही कोळंबी मऊ शरीराच्या भक्ष्यांनाच अधिक शिकार बनवत असल्याचे आता दिसून आले आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी’ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

न्यूयॉर्कमधील अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथील संशोधक रसेल बिकनेल यांनी याबाबतची माहिती दिली. सध्याच्या कोळंबीसारख्या या प्रागैतिहासिक काळातील जलचराची लांबी तीन फुटांपर्यंत होती. त्यांच्या तोंडावर भयावह दिसणारे हे दोन काटे होते. ते एखाद्या भक्ष्याच्या शरीरात पिनकुशनमध्ये टाचणी खोवावी तसे टोचले जात होते. त्यांच्या सहाय्याने असे भक्ष्य तोंडाजवळ ओढून आणले जात असे.

Back to top button