प.बंगालमध्‍ये मतदानावेळी हिंसाचाराचा भडका का उडाला? : ‘बीएसएफ’ने केला माेठा खुलासा | पुढारी

प.बंगालमध्‍ये मतदानावेळी हिंसाचाराचा भडका का उडाला? : 'बीएसएफ'ने केला माेठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीसाठीच्‍या शनिवारी (दि.८) मतदान झाले. यावेळी प्रचंड हिंसाचार झाला. उत्तरेपासून दक्षिण बंगालपर्यंत जाळपोळ, बॉम्बस्फोट आणि गोळीबारात नऊ जिल्ह्यांत १८ जण ठार तर ५० हून अधिक जखमी झाले आहेत. या हिंसाचारात ३० हून अधिक जण ठार झाल्‍याची भीती विरोधी पक्षांनी व्‍यक्‍त केली आहे. हिंसाचारात मृत्‍युमुखी पडलेल्‍यांमध्‍ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे १० कार्यकर्ते होते. तर भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन आणि सीपीआय(एम)चे दोन कार्यकर्‍त्याचा समावेश आहे. केंद्र आणि राज्याचे १.७ लाख सुरक्षा दल तैनात असताना ही स्थिती कायम होती. आता या हिंसाचारावर ‘बीएसएफ’ने खुलासा केला आहे.

निवडणूक आयोगाने संवेदनशील मतदान केंद्रांची माहितीच दिली नाही

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठा खुलासा केला आहे. बीएसएफचे डीआयजी एसएस गुलेरिया म्हणाले की, सीमा सुरक्षा दलाने संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला अनेक पत्रे लिहिली होती, परंतु ७ जून वगळता इतर कोणत्याही दिवशी कोणतीही माहिती दिली गेली नाही. केवळ संवेदनशील बूथची संख्या देण्यात आली होती, परंतु त्यांच्या स्थानाबद्दल किंवा इतर कोणतीही माहिती दिली गेली नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Bengal Panchayat polls : प्रत्‍यक्षात संवेदनशील मतदान केंद्रांची संख्‍या अधिक

स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार, बीएसएफची तैनाती करण्यात आली होती. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि राज्य सशस्त्र पोलिसांच्या ५९,००० तुकड्या 25 राज्यांमधून पश्‍चिम बंगालमध्‍ये निवडणूक कर्तव्यासाठी दाखल झाल्या होत्या, परंतु संवेदनशील मतदान केंद्रांवर त्यांचा पुरेसा वापर करण्यात आला नाही. राज्याने केवळ सीएपीएफद्वारे व्यवस्थापित केवळ 4,834 मतदान केंद्रांना संवेदनशील घोषित केले होते, तर प्रत्यक्षात त्याहूनही अधिक संवेदनशील मतदान केंद्रे अधिक होती, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

निवडणुकांचे सुरक्षित आयोजन सुनिश्चित करण्यासाठी, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि इतर राज्य पोलिस दलातील 59,000 कर्मचार्‍यांना मतदान केंद्रांच्या रक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, ज्यात 4834 संवेदनशील बूथचा समावेश होता, ज्यांचे व्यवस्थापनCAPF द्वारे होते.

हेही वाचा :

 

Back to top button