Heavy Rainfall: उत्तर भारतात पावसाचा कहर; पूरपरिस्थिती आणि भूस्खलनाचा इशारा | पुढारी

Heavy Rainfall: उत्तर भारतात पावसाचा कहर; पूरपरिस्थिती आणि भूस्खलनाचा इशारा

पुढारी ऑनलाईन : उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) या राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील नद्या इशारा पातळीच्या वरुन वाहत आहेत. यामुळे हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान येथील काही भागात भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी आणि कुल्लू येथे सतत मुसळधार पावसामुळे बियास नदीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले असून, अनेक नागरिक पूराच्या पाण्यात अडकले होते. कुल्लू जिल्ह्यात बियास नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. दरम्यान कुल्लू जिल्हा मुख्यालयातील ब्यासा मोर येथील विपाशा मार्केटला लागून असलेला पार्किंगचा भाग कोसळल्याने ५० हून अधिक गाड्या नदीत वाहून गेल्याची माहिती आहे. दैवाने अपघाताच्या वेळी कारमध्ये  (Heavy Rainfall) कोणीही नव्हते.

Heavy Rainfall: राष्ट्रीय महामार्ग 3 चा काही भाग वाहून गेला

हिमाचल प्रदेशमधील लाहौल आणि स्पीती या दोन जिल्ह्यात सतत आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवामान विभागाने पुढच्या ४८ तासात या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान या भागात पूर आणि हिमस्खलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. येथील कुल्लू बसस्थानकाजवळ मुसळधार पावसामुळे पाण्याचा कालवा फुटला आहे. कुल्लू-मनाली मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे कुल्लू आणि मनाली येथून अटल बोगदा आणि रोहतांगकडे जाणारी वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच कुल्लू येथे बियास नदीच्या प्रवाहात राष्ट्रीय महामार्ग 3 चा काही भाग वाहून देखील गेला आहे.

हरियाणामध्ये देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गुरुग्राम येथे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तसेच येथील अंबाला कॅंटमधील हाऊसिंग बोर्ड कॉलनीच्या आसपास असलेल्या काही घरांमध्ये पावसाचे (Heavy Rainfall) पाणी शिरले.

जम्मू श्रीनगर हा राष्ट्रीय महामार्ग (NH44) भूस्खलन झाल्यामुळे रामबन येथे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. भूस्खलन आणि खराब हवामान तसेच महामार्ग बंद झाल्याने उधमपूरमध्ये शेकडो वाहने अडकली आहेत. राजस्थानच्या सीकरमध्ये संततधार पावसामुळे पाणी साचले आहे. शिमला-कालका या हेरिटेज रेल्वे ट्रॅकवर मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पाणी साचल्याने आजही येथील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे, अशी माहिती हिमाचल प्रदेशचे वाहतूक, पर्यटक आणि रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा:

 

Back to top button