World Cup T20 : १८ वर्ष झाली, भारत न्‍यूझीलंडविरोधात ‘ही’ कामगिरी करु शकला नाही | पुढारी

World Cup T20 : १८ वर्ष झाली, भारत न्‍यूझीलंडविरोधात 'ही' कामगिरी करु शकला नाही

शारजाह : पुढारी ऑनलाईन

टी-२० वर्ल्डकपमध्‍ये पहिल्‍याच सामन्‍यात  पाकिस्‍तानविरोधात भारताचा नामुष्‍कीजनक पराभव झाला.  कोट्यवधी भारतीयांच्‍या पदरी निराशा पडली. यानंतर पाकिस्‍तानने न्‍यूझीलंडचाही पराभव केला. यामुळे भारताला थोडा दिलासाही मिळाला आहे. स्‍पर्धेत कमबॅक करण्‍यासाठी आता भारताला न्‍यूझीलंडविरोधातील ( World Cup T20 ) सामना जिंकावाच लागणार आहे. मात्र वर्ल्डकपमधील मागील १८ वर्षांच्‍या इतिहास पाहता न्‍यूझीलंडविरोधातील एकही सामना भारतीय संघाने जिंकलेला नाही.

( World Cup T20 ) भारतासमोर मोठे आव्‍हान

क्रिकेट वर्ल्डकपमध्‍ये न्‍यूझीलंडविरोधात भारताची कामगिरी खूपच खराब आहे. २००३ पासून वर्ल्डकप स्‍पर्धेत भारताने न्‍यूझीलंडविरोधात एकही सामना जिंकलेला नाही. ( World Cup T20) आता ३१ ऑक्‍टोबर रोजी दोन्‍ही संघ आमने-सामने असतील.

वर्ल्डकप स्‍पर्धेत भारत आणि न्‍यूझीलंडमध्‍ये आतापर्यंत पाच सामने झाले आहेत. यातील चार सामने न्‍यूझीलंडने जिंकले आहेत. तर २०१९मधील एक सामना अर्निणित राहिला आहे. हा सामना पावसामुळे रद्‍द झाला होता. केवळ टी-२० वर्ल्डकप स्‍पर्धेतचा विचार करता दोन्‍ही संघ दोनवेळा भिडले आहेत. या दोन्‍ही सामन्‍यांमध्‍ये भारताचा पराभव झाला आहे.

वर्ल्डकप सेमिफायनलमध्‍येही न्‍यूझीलंडनेच मारली होती बाजी

२०१९मध्‍ये झालेल्‍या एकदिवसीय वर्ल्डकप स्‍पर्धेच्‍या सेमिफायनलमध्‍ये न्‍यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. आयसीसीच्‍या विविध स्‍पर्धांमध्‍ये दोन्‍ही संघांनी आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. यातील केवळ तीन सामने भारताने जिंकले आहेत. तर न्‍यूझीलंडने आठ सामने जिंकले आहेत. एक सामना पावसामुळे रद्‍द झाला हाेता.

वर्ल्डकपमध्‍ये दोन्‍ही संघ ९ वेळा आमने-सामने

१९८७च्‍या वर्ल्डकप स्‍पर्धेत भारताने न्‍यूझीलंडचा दोनवेळा पराभव केला होता. आयसीसी स्‍पर्धेत दोन्‍ही संघांनी पहिला सामना १९७५मध्‍ये खेळाला. या सामन्‍यात न्‍यूझीलंडने भारतावर मात केली होती. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपमध्‍ये दोन्‍ही संघ आतापर्यत ९ वेळा
आमने-सामने आले होते. यामध्‍येही पाच सामने न्‍यूझीलंडने तर तीन भारताने जिंकले आहेत. एक सामना रद्‍द झाला होता.

‘त्‍या’ सामन्‍यात भारताचा संपूर्ण संघ ७९ धावांवर बाद

२०१९च्‍या वर्ल्डकप स्‍पर्धेतील सेमिफायनलमध्‍ये भारत -न्‍यूझीलंड आमने-सामने आले. यावेळी न्‍यूझीलंडने १८ धावांनी भारताचा पराभव केला होता. तर २००० मध्‍ये चॅम्‍पियन ट्रॉफीच्‍या अंतिम सामन्‍यात न्‍यूझीलंडने भारताचा चार विकेट राखवून पराभव केला होता. तर २००७च्‍या टी-२० वर्ल्डकप सामन्‍यातही न्‍यूझीलंडने भारताचा १० धावांनी पराभव केला होता.  २०१६ वर्ल्डकपमध्‍ये न्‍यूझीलंडने भारताचा तब्‍बल ४७ धावांनी पराभव केला होता. विशेष म्‍हणजे, यावेळी न्‍यूझीलंडने भारताला केवळ १२७ धावांचे आव्‍हान दिले होते. यावेळी भारताचा संपूर्ण संघ ७९ धावांवर बाद झाला होता.

एकुणच वर्ल्डकप स्‍पर्धेत न्‍यूझीलंड विराेधात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनकच राहिली आहे. आता रविवार ३१ ऑक्‍टाेबर राेजी हाेणार्‍या सामना दाेन्‍ही संघासाठी महत्‍वपूर्ण आहे. या सामन्‍याकडे देशवासियांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचलं का ?

पहा व्‍हिडिओ :

 

 

Back to top button