राजकीय सारीपाट उधळला ! पुण्यातील भाजपचे कार्यकर्ते गांगरले, विरोधी पक्षांत अस्वस्थता | पुढारी

राजकीय सारीपाट उधळला ! पुण्यातील भाजपचे कार्यकर्ते गांगरले, विरोधी पक्षांत अस्वस्थता

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नव्या चालीने पुण्यातील भाजपचे कार्यकर्ते गांगरले, तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हतबल झाले आहेत. विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांचे मनसुबे राजकीय सारीपाटावरील या अनोख्या चालीने अक्षरशः उधळून गेले आहेत. पुणे शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होती. ते दोन्ही पक्षच राज्यात सत्तेसाठी एकत्र आल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कोणाशी लढायचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीचा मुख्य पक्षच फुटल्याने विरोधकांच्या शिडातील हवाच निघून गेली आहे. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचे कार्यकर्ते किती निवडून येणार? हा प्रश्नच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था तर केविलवाणी होणार आहे. रिपब्लिकन पक्षाला आता जागा मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांची खूप मनधरणी करावी लागेल, तर वंचित बहुजन आघाडीची विरोधी पक्षाच्या आघाडीत संधी वाढू शकेल. पुण्यात आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर असताना भाजपमधून राष्ट्रवादीत किती जण जाणार याची, तर भाजप-शिवसेना (शिंदे गट) सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये किती माजी नगरसेवक जाणार, याची चर्चा रंगत असे. आता सर्वच चित्र पालटले आहे.

महापालिकेच्या गेल्या सभागृहातील 164 माजी नगरसेवकांपैकी भाजपचे 99, तर राष्ट्रवादीचे 43 नगरसेवक होते. शिवसेनेचे 9, काँग्रेसचे 10, मनसेचे 2 तर एमआयएमचा 1 नगरसेवक होता. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांचे नगरसेवक एकत्र केल्यास ती संख्या 143 होते. केवळ 21 जागा शिल्लक राहतात. त्या जागांमध्ये तीन पक्षांसाठीच्या जादा जागा ठरतील. त्यामुळे सध्या एकमेकांविरुद्ध तयारीला लागलेल्या या पक्षांच्या कार्यकर्त्यांसमोर अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. वाद विकोपाला गेल्यास त्यांना मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग स्वीकारावा लागेल. त्याचा फटका भाजपपेक्षाही राष्ट्रवादीला जास्त बसेल.

महापालिकेच्या निवडणुका दिवाळीच्या आसपास झाल्यास, त्यानंतर होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांना लढण्यासाठी पुरेशा जागा मिळतील. मात्र, त्यांना साधनसामग्री कमी पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या जोडीला वंचित बहुजन आघाडी आल्यास काही प्रभागांत त्यांची ताकद वाढेल. सत्ताधारी पक्षात उमेदवारी न मिळाल्यास, त्या बंडखोरांची कुमकही विरोधी आघाडीला मिळेल.

भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्था मात्र अवघड झाली आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. मात्र, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचा दबदबा पुन्हा वाढणार आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रिपद घेतले नाही, तर भाजपला काही संधी मिळेल. पवार हेच पालकमंत्री झाल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांची आणखी पंचाईत होण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांना ‘त्यागा’ची संधी

भाजपसाठी तीन पक्षांच्या युतीमध्ये फारशा जादा जागा मिळणार नाहीत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी अनेक माजी नगरसेवकांना घरी बसविण्याचा निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी घेऊ शकतात. त्यामुळे गेल्या वेळी निवडून आलेल्या अनेक माजी नगरसेवकांना ’त्यागा’ची संधी मिळू शकते. भाजपच्या प्रदेश कार्य समितीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांनी पदे मागू नयेत, येत्या वर्षभ?ात त्याग करण्याची तयारी ठेवा, असे सूचित केले होते. त्यांनी त्या वेळी केलेल्या सूतोवाचामागील भूमिका आता कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा

पुण्यात आठपैकी सहा जागा भाजपकडे होत्या. त्यापैकी पोटनिवडणुकीत कसबा पेठेची जागा काँग्रेसकडे गेली. महाविकास आघाडीचे मोठे आव्हान भाजपसमोर होते. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा पाठिंबा मिळाल्याने भाजपची विधानसभेची स्थिती मजबूत झाली. मित्रपक्षाकडून हडपसर आणि खडकवासला मतदारसंघाची मागणी होऊ शकते. वडगाव शेरीत राष्ट्रवादीचा आमदार आहे. मात्र, नव्या राजकीय घडामोडींमुळे अन्य पाच मतदारसंघांत भाजपची स्थिती मजबूत झाली आहे.

Back to top button