मिम्सचा पाऊस : किरीट सोमय्या कागलच्या उरुसाला येणार! | पुढारी

मिम्सचा पाऊस : किरीट सोमय्या कागलच्या उरुसाला येणार!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘किरीट सोमय्या आता कागलच्या उरुसाला येणार… सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली… आता बोटाला शाई नको चुनाच लावा… मतदान कार्ड विकायला काढले आहे…’ अशा एकसे बढकर एक भन्नाट मिम्सचा सोशल मीडियावर रविवारी दुपारनंतर अक्षरश: पाऊस पडला.

राज्यात रविवारी सत्तानाट्याचा चौथा अंक पार पडला. सकाळी सारे काही अलबेल आहे असे वाटत असतानाच दुपारी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप झाला. काही काळ आश्चर्याने या घटनेकडे पाहणार्‍यांनी दुपारनंतर मात्र वेगवेगळ्या मिम्सद्वारे अनेकांनी सत्तेसाठी काहीही करणार्‍या नेत्यांचे कान टोचत आपल्या भावना व्यक्त केल्या. एकमेकांविरोधात केलेली विधाने, त्याचे व्हिडीओ, त्यावर तयार केलेल्या चित्रफिती, विविध प्रतिक्रिया व्यक्त करत करमणुकीबरोबरच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सर्वसामान्यांच्या नेमक्या भावनाही व्यक्त केल्या.

शरद पवारांनी भाकरी परतली; पण अजित पवारांनी चूलच वेगळी मांडली आणि सगळा पिठाचा डबाच गायब केला, राष्ट्रवादी कोणाची, काकाची की पुतण्याची? अचानक झोपमोड करायची दादांची सवय काय जात नाही, मागच्या वेळी पहाटेची आणि आता दुपारची झोपडमोड केली. तेही रविवार असताना आणि मटण खाऊन सुस्त झोपेत असताना, ती पहाट विसरून आता ही दुपार कायमची आठवणीत राहील, अख्या महाराष्ट्राला. डबल इंजिनला आता तिसरा डबा जोडला, साहेब गुगली टाकत राहिले, फडणवीसांनी यॉर्कर टाकून डावच संपवला, राष्ट्रवादी नको म्हणून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो म्हणार्‍यांचे आता काय, अशा अनेक मिम्स व्हायरल होत होत्या.

आता एकदा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी तेवढे एकत्र आले की, आम्ही आनंदाने डोळे मिटायला मोकळे-भारतीय जनता, पहाटेचा झाला, दुपारचा झाला, आता एकदा संध्याकाळचा तेवढा शपथविधी घ्या म्हणजे झालं, मतदान कार्ड विकायला काढले आहे, निवडणूक आयोगाला एक विनंती… आता मतदानावेळी बोटाला शाई ऐवजी चुना लावा, आणखी एक उपमुख्यमंत्री करा, म्हणजे तीन उपमुख्यमंत्री होतील, तीन शिफ्टमध्ये काम करतील- एक एमआयडीसी कामगार अशा मिम्सद्वारे अनेकांनी आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या.

राज्यातील या घडामोडीने जिल्ह्यातील राजकारणावर परिणाम होणार आहेत. त्याचीही झलक काही मिम्सद्वारे दिसली. भाजपचे समरजित घाटगे आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्यातील दिवसेंदिवस वाढता संघर्ष सर्वांनाच माहीत आहे. त्यावर आता ‘सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली’ अशी अवस्था समरजित घाटगे यांची झाल्याचे सांगणारी मिम्स वेगाने व्हायरल होत होत्या. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन हसन मुश्रीफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते. त्यावर आता किरीट सोमय्या कागलच्या उरुसाला येणार आणि गलेफ बांधून, जेऊन जाणार, अशीही व्हायरल मिम्स लक्षवेधी ठरत होती.

कुठे ही जा; पण सांगून जा

शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काही व्हिडीओ, एका कार्यक्रमातील शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरील नाट्याचा प्रसंगाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमात एकवेळ मी अविवाहित राहीन; पण राष्ट्रवादीशी विवाह करणार नाही, असे सांगत राष्ट्रवादी सोबत घेणार नाही.. नाही.. नाही.. असे ठणकावून सांगणारा तसेच एका कार्यक्रमात भाषण करताना मी कधी कोणाच्या भानगडीत पडत नाही आणि पडलो तर मी सोडत नाही, असा फडणवीस यांचा व्हिडीओ, तसेच एका करमणुकीच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार यांच्या पात्रातील संवाद असलेल्या व्हिडीओत शरद पवार अजित पवारांना उद्देशून ‘कुठे जा; पण मला सांगून जा’ असा म्हणणारा व्हिडीओ अनेकजण शेअर करत होते.

Back to top button