नव्या सौदी अरेबियाने कट्टरतेची कात टाकली! | पुढारी

नव्या सौदी अरेबियाने कट्टरतेची कात टाकली!

रियाध, वृत्तसंस्था : मक्का-मदिनेचा देश म्हणून सौदी अरेबियाची ओळख आहे. या देशात एकेकाळी रहिवासापासूनही अन्य धर्मीयांना वंचित करण्यात आले होते. प्रिन्स सलमान यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर इतर अनेक बदलांसह धर्म स्वातंत्र्याचे वारे सौदीत वाहू लागले आहेत. मुस्लिमांची मक्का-मदिना यात्रा तर हक्काचीच, पण आता सौदीत ख्रिश्चन आणि ज्यूंची एक धार्मिक यात्राही सुरू झालेली आहे.

सौदीतील एका ओसाड समुद्र किनार्‍याची ही यात्रा आता जगभरातील ख्रिश्चन आणि ज्यूंचा एक वर्ग करू लागलेला आहे. ख्रिश्चन बांधव सिनाई पर्वताच्या शिखराकडे पाहून हा बायबल वाचत आहेत. अर्थात बहुतांश लोकांच्या मते, सिनाई पर्वत इजिप्तमध्ये आहे; पण तो इजिप्तमध्ये नव्हे तर सौदीतच असल्याचे मानणारा एक मोठा वर्गही या दोन्ही धर्मीयांमध्ये आहे.

परमेश्वराने बायबलमध्ये (ओल्ड टेस्टामेंट) सांगितलेल्या 10 आज्ञा (टेन कमांडमेंटस्) सौदीच्या सिनाई पर्वत शिखरावरूनच दिल्या होत्या, अशी या वर्गाची श्रद्धा आहे.

परवापरवापर्यंत सौदीत उघडपणे इतर धर्मांचे पालन करण्यास संपूर्ण बंदी होती. प्रिन्स सलमान यांच्या राज्यात ख्रिश्चन व ज्यूंसाठी सौदीत सुरू झालेल्या या यात्रांवरून कट्टरवाद्यांमध्ये अस्वस्थता आहे. प्रिन्स सलमान यांनी मात्र याकडेही देशाच्या आर्थिक विकासाची एक संधी म्हणून पाहिलेले आहे. खनिज तेल संपेल तेव्हा सौदीचे काय होईल, ही त्यांची चिंता त्यांच्या या दूरद़ृष्टीच्या मुळाशी आहे, तर दुसरीकडे देशातील कट्टरवादी अस्वस्थ आहेत.

सौदी सब की…

बौद्ध भिक्खूंची सभाही, ज्यूंचा रब्बीही!

2015 मध्ये प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली आणि सौदीतील धार्मिक कट्टरवाद काहीसा कमी होत गेला.
महिलांच्या ड्रायव्हिंगवरील निर्बंध त्यांनी हटवले. गतवर्षी 2022 मध्ये बौद्ध भिक्खूंची धार्मिक सभाही सौदीत झाली होती.

ज्यू पर्यटकांनी मदिनेचा दौरा केला होता. रियाधमधील एका ज्यू व्यक्तीने स्वत:ला सौदी अरेबियाचा प्रमुख रब्बी (धर्मगुरू) म्हणूनही घोषित केले आहे.

अर्थात, सौदीत आजही इतर धर्मीयांना त्यांच्या धर्माच्या प्रचाराची, सार्वजनिक अनुसरणाची कायदेशीर परवानगी नाही. इतरांना इस्लाम स्वीकारण्याची परवानगी आहे; पण इस्लाम सोडण्याची परवानगी नाही.

सिनाई इजिप्तमध्ये नव्हे, सौदीत; नवा दावा

पवित्र कुराणातील ‘सुरह अल मोमिनीन’च्या आयत क्रमांक 20 मध्ये सिनाई पर्वताला तुर ए सिना म्हटलेले आहे. परमेश्वराने प्रेषित मोझेस (हजरत मुसा अलैस्सलाम) यांना सिनाई पर्वतावर साक्षात दर्शन दिले होते.

अगदी अलीकडे डाऊटिंग थॉमस रिसर्च फाऊंडेशन आणि संरक्षण तज्ज्ञ रयान मॉरो यांनी मोझेस यांच्याशी संबंधित सिनाई पर्वत सौदीत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. नंतर सौदीनेही या भागात नवे शहर वसविण्याची तयारी सुरू केली असून, 500 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

Back to top button