रशियातील फसलेले बंड | पुढारी

रशियातील फसलेले बंड

लष्कराची मदत न घेताच पुतीन यांनी प्रिगोझीनचा उठाव हाणून पाडला. प्रिगोझीनच्या बंडाने पुतीन यांच्या राजकीय प्रभावावर निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुतीन व प्रिगोझीन यांचे सौख्य जगजाहीर होते. एकेकाळी प्रिगोझीन हा पुतीन यांचा ‘खानसामा’ म्हणून ओळखला जायचा; कारण ‘क्रेमलिन’मधील मेजवान्यांची कंत्राटे त्याला मिळायची.

‘वॅगनर’ नावाच्या खासगी सैन्य कंपनीचा प्रमुख येवगिनी प्रिगोझीन याने रशियाच्या सरकारविरुद्ध केलेली बंडाळी 24 तासांच्या आत फसली असली, तरी त्याचे दूरगामी परिणाम संभवतात. प्रिगोझीन याचे बंडाचे निशाण प्रत्यक्षपणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरुद्ध नव्हते; पण या बंडाळीमुळे पुतीन यांच्या राजकीय वर्चस्वाला तडे निश्चितच गेले आहेत. पुतीन यांनी नियुक्त केलेले रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू आणि रशियन लष्कराचे प्रमुख वॅलेरी गेरासीमोव्ह अशा दोन व्यक्तींविरुद्ध प्रिगोझीन याचे बंड होते. रशिया-युक्रेन युद्धात ‘वॅगनर’ गट सक्रियपणे रशियाच्या बाजूने लढतो आहे. ‘वॅगनर’ गटाच्या बहाद्दुरीने रशियाने एप्रिल-मे महिन्यात युक्रेनच्या बखमुत शहरावर भीषण लढाईनंतर ताबा मिळवला होता.

अनेक महिन्यांच्या ‘जैसे थे’ स्थितीनंतर रशियाला मिळालेले हे पहिलेच मोठे यश होते. असे असूनदेखील रशियाच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात ‘वॅगनर’ गटाचे अनेक सैनिक ठार झाल्याचा आरोप करत प्रिगोझीन याने बंड पुकारले होते. रशियाचे संरक्षणमंत्री व लष्करप्रमुख यांच्या इशार्‍यावरून हे हल्ले झाल्याचा प्रिगोझीन याला दाट संशय असल्याने त्याने दोघांनाही पदच्युत करण्याची मागणी करत मॉस्कोकडे कूच केली होती. रशियन हवाई दलाने ‘वॅगनर’ सैनिकांवर खरोखरच हल्ले केलेत का? याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. मात्र, प्रिगोझीन आणि रशियन लष्कर यांच्यातील संबंध केवळ ताणलेलेच नव्हते, तर त्यांच्यात प्रचंड कटुता निर्माण झाली होती, हे नक्की! मे महिन्यात प्रिगोझीन याने ‘टेलिग्राम’ या समाजमाध्यमावर एक व्हिडीओ प्रसारित करत लष्करी नेतृत्वावर उघड टीका केली होती. त्यापूर्वीसुद्धा त्याने रशियन लष्कराला कुचकामी ठरवणारी, विशेषत: लष्करी नेतृत्वाच्या निर्णयांना चुकीचे ठरवणारी वक्तव्ये केली होती.

प्रिगोझीनच्या मुख्यत: दोन तक्रारी होत्या; एक, ‘वॅगनर’ सैनिकांना आवश्यक असणार्‍या युद्धसामग्रीचा पुरवठा करण्यात रशियन लष्कर अत्यंत दिरंगाई करत आहे आणि दोन, लष्करप्रमुखांनी काढलेल्या वटहुकुमानुसार ‘वॅगनर’ समूहाला रशियन लष्कराशी नव्याने करारमदार करावे लागणार आहेत, जे प्रिगोझीनला अजिबात रुचले नव्हते. ‘वॅगनर’ हा एक खासगी सैन्य समूह असल्याने त्यावर रशियन लष्कराचे वर्चस्व स्वीकारण्यास प्रिगोझीन तयार नव्हता, तर रशियन लष्कराला नाकापेक्षा मोती जड नको होता. याबाबत, पुतीन यांची भूमिका स्पष्टरीत्या माहिती नसली, तरी राष्ट्राध्यक्ष या नात्याने त्यांचे मत रशियन लष्करापेक्षा वेगळे नसणार, यात शंका नाही. त्यामुळेच, पुतीन यांनी प्रिगोझीनच्या मागण्यांना दाद तर दिली नाहीच; शिवाय राष्ट्राला दिलेल्या संदेशात आपण लष्कराला ही बंडाळी कठोरपणे मोडून काढायचे आदेश दिल्याचे ठणकावून सांगितले.

पुतीन यांनी हे जाहीर वक्तव्य दिले असले, तरी प्रत्यक्षात प्रिगोझीनच्या आदेशाने मॉस्कोवर चाल करून येणार्‍या ‘वॅगनर’ समूहाच्या सैनिकांना रशियन लष्कराने कुठेही अडवले नाही. प्रिगोझीनने युक्रेन सीमेवरील दोन रशियन शहरे सहजपणे ताब्यात घेतली व आपल्या सशस्त्र सैनिकांसह रशियन राजधानीच्या दिशेने कित्येक मैल कूच केली, तरीसुद्धा त्यांना रशियन लष्कराने कुठेही आडकाठी घातली नाही. यामागे पुतीन व लष्करी नेतृत्वाची योजना स्पष्ट होती. एक तर, युक्रेन सीमेपासून प्रिगोझीन त्याच्या ‘वॅगनर’ सैनिकांसह जितका दूर जाणार, तेवढी त्याची शक्ती कमी होत जाणार, हे प्रिगोझीन व पुतीन या दोघांनाही ठाऊक होते. दोन, प्रिगोझीनचे बंड मोडून काढत हिंसाचार घडवण्यापेक्षा त्याला रशियातून, विशेषत: लष्करातून, कुठलाही पाठिंबा नाही हे ठळकपणे जगाला व खुद्द प्रिगोझीनला दाखवणे पुतीन यांना अधिक श्रेयस्कर वाटले. तीन, ‘वॅगनर’च्या भाडोत्री सैनिकांवर हल्ला करत त्या सर्वांना रशियाच्या विरुद्ध करण्याऐवजी त्यांच्यात फूट पाडत अनेकांना रशियन लष्करात भाडोत्री तत्त्वावर सहभागी करण्यात रशियाचे हित आहे, हे अनुभवी पुतीन यांना तत्काळ उमगले. परिणामी, पुतीन यांनी लष्कराची मदत न घेताच प्रिगोझीनचा उठाव हाणून पाडला. याचा अर्थ पुतीन यांच्यासाठी सर्व काही सुरळीत झाले आहे, असे नाही.

प्रिगोझीनच्या बंडाने पुतीन यांच्या राजकीय प्रभावावर निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुतीन व प्रिगोझीन यांचे सौख्य जगजाहीर होते. एकेकाळी प्रिगोझीन हा पुतीन यांचा ‘खानसामा’ म्हणून ओळखला जायचा; कारण ‘क्रेमलीन’मधील मेजवान्यांची कंत्राटे त्याला मिळायची. पुतीन यांच्या परवानगीनेच प्रिगोझीनने ‘वॅगनर’ समूहाचे सह-संस्थापक असल्याचे मान्य केले होते आणि पुतीन यांच्या पाठिंब्याने आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये ‘वॅगनर’ समूहाला सशस्त्र संघर्षात कामे करण्याची कंत्राटे मिळवली होती. ‘वॅगनर’ समूहात काम करण्यासाठी (म्हणजे भाडोत्री तत्त्वावर लढण्यासाठी) रशियन नागरिकांना प्रोत्साहित करणार्‍या मोठमोठ्या जाहिराती रशियात विविध भागांमध्ये लागलेल्या असतात, त्या रशियन सरकारचा या प्रकारच्या समूहाला पाठिंबा असल्याशिवाय शक्य नाही.

अगदी महिनाभरापूर्वी रशियाच्या संसदेने पारित केलेल्या निवेदनात रशियन लष्कर व युद्धात मदत करणारे रशियन स्वयंसेवक यांच्यासह ‘वॅगनर’ समूहातर्फे रशियाच्या बाजूने लढणार्‍या भाडोत्री सैनिकांचे विशेष कौतुक करण्यात आले होते. रशियातील शहरांतील रस्त्यांवरच्या दुकानांमध्ये पुतीन आणि लष्करी नेतृत्व यांच्यासह प्रिगोझीनच्या प्रतिमेचे मुखवटे सुद्धा उपलब्ध असायचे. असा हा प्रिगोझिन मागील काही आठवड्यांपासून उघडपणे लष्करी नेतृत्वाविरुद्ध बोलत असतांनाच पुतीन यांनी त्याचे पंख का कापले नाहीत, की पुतीन यांनी ती क्षमताच गमावली आहे असे प्रश्न रशियातील समाज माध्यमांमध्ये उपस्थित होत आहेत. एक बाब स्पष्ट आहे की वॅगनर समूहाचा विस्तार व ताकद सातत्याने वाढत होती आणि त्याला लगाम लावण्याची आवश्यकता रशियन सरकारला तिव्रतेने भासू लागली होती. त्यामुळेच, वॅगनर व त्यासारख्या रशियाच्या बाजुने लढणार्‍या गटांनी 1 जुलैपर्यंत रशियन लष्कराशी नव्याने करार करण्याचे फर्मान काढण्यात आले असणार. कोणतीही राज्यसंस्था हात-पाय पसरवत सशक्त होत जाणार्‍या समूहांना पुर्णपणे आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी सतत कार्यरत असणार, यात नवल ते नाही. इथे कळीचा मुद्दा हा वॅगनर समूहाच्या स्थापनेशी आणि त्यांच्या पैश्यांच्या स्त्रोतांशी संबंधीत आहे.

27 जुन रोजी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मान्य केले की मागील एक वर्षात रशियाने वॅगनर समूहाला युक्रेन युद्धात मदत करण्यासाठी जवळपास 1 बिलियन डॉलर्स दिले आहेत. खरे तर, रशियातील कायद्यानुसार खाजगी सैन्य कंपन्या अवैध आहेत. अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये खाजगी सैन्य कंपन्या कायदेशीर आहेत आणि अमेरिकेने अफगाणिस्तान व इराक युद्धात अशा खाजगी सैन्यांना पुरेपुर कामे सोपवली होती. रशियात कायद्याने खाजगी सैन्य उभारणीस बंदी असल्याने पुतीन यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते की अशा खाजगी सैन्य समूहांची रशियात स्थापना होऊ शकत नाही, पण अशा परकीय कंपन्या जर रशियात कायद्याचा भंग न करता कार्यरत असतील तर त्यावर सरकार कारवाई करणार नाही. पुतीन व रशियन लष्कराने वॅगनर समूहाला कंत्राटे देण्यासाठी शोधलेली ही पळवाट होती. वॅगनर ही कायदेशीररित्या अर्जेंटिनात स्थापन करण्यात आलेली आणि हाँगकाँग व रशियातील सेंट पिटर्सबर्ग इथे उप-मुख्यालये असलेली कंपनी असल्याचे आंतरजाळीय सुत्रांवरून कळते.

प्रिगोझिन आणि दिमीत्री उत्कीन या सैन्यातून निवृत्त झालेल्या अधिकार्‍याने सन 2014 मध्ये वॅगनर समूहाची स्थापना केली. हा दिमीत्री उत्कीन नव-नाझी असल्याचे मानण्यात येते, कारण त्याने स्वत:च्या शरिरावर नाझी चिन्हे कोरून घेतली आहेत. सैन्यात कार्यरत असतांना त्याने वॅगनर हे टोपण नाव धारण केले होते. या मागे त्याची प्रेरणा हिटलर ला आवडणारा 18 व्या शतकातील वॅगनर हा जर्मन कवी होता. यावरूनच दिमीत्री उत्कीनने त्याच्या खाजगी सैन्य समूहाचे नामकरण वॅगनर प्रायवेट मिलिटरी कम्पनी असे केले होते. उत्कीन सध्या कुठे आहे आणि जिवंत तरी आहे का याबाबत साशंकता आहे.

दिमीत्री उत्कीन हा नव-नाझी असला तरी वॅगनर समूहाची कोणतीही विचारधारा नाही. रशियन सरकारचे धन आणि रशियन लष्कराच्या प्रशिक्षण सुविधा यांच्या आधारे वॅगनर समूहाने स्वत:चे साम्राज्य उभारले असल्याने रशियन हितसंबंधांची जगभर जोपासना करणे ही एकमात्र विचारधारा वॅगनर समूहाची आहे. हा समूह युक्रेन, सुदान व सिरीया या देशांशिवाय उत्तर आफ्रिका व मध्य आफ्रिकेतील किमान 15 ते 20 देशांतील संघर्षांमध्ये गुंतलेला आहे. या प्रत्येक देशात हा समूह रशियन सरकारशी सौख्य असलेल्या गटाकरीता कार्यरत आहे. साहजिकच, वॅगनर व प्रिगोझिन विरुद्ध कठोर कारवाई करणे पुतीन सरकारला शक्य नव्हते.

दुसरीकडे, वॅगनर च्या एकंदरीत पार्श्वभुमीमुळे युक्रेन व पाश्चिमात्य देशांसाठी प्रिगोझिन च्या बंडात आनंद मानण्यासारखे काही नव्हते. अमेरिकेसाठी प्रिगोझिन व दिमीत्री उत्कीन हे दोघेही मोस्ट वाँटेडफ आहेत आणि त्यांच्या शिरावर लाखो डॉलर्स चे बक्षिस ठेवण्यात आलेले आहे. प्रिगोझिन व उत्कीन यांच्या नेतृत्वात वॅगनर च्या भाडोत्री सैनिकांनी युक्रेन आणि अनेक अफ्रिकी देशांमध्ये मानवाधिकारांचे व युद्ध नियमांचे निर्घुण उल्लंघन केल्याचे अनेक आरोप यापुर्वी पाश्चिमात्य देशांनी केले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) सुद्धा खाजगी सैन्य कंपन्यांवरील आपल्या अहवालात वॅगनर च्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवला होता. पाश्चिमात्य जगतात आधीच खलनायक ठरलेल्या प्रिगोझिन साठी आता रशियात देखील जागा उरलेली नाही. पुतीन यांनी प्रिगोझिनला जीवदान देत बेलारुस मध्ये सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आहे. याची परतफेड प्रिगोझिनने युक्रेन विरुद्धच्या युद्धात कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहकार्याच्या माध्यमातून करणे पुतीन यांना अपेक्षित असेल. इथुन पुढे वॅगनर समूहाची युक्रेन युद्धातील पोकळी भरून काढणे आणि वॅगनर च्या अफ्रिकी देशांतील मोहिमांचे नेतृत्व विश्वासू व्यक्तींच्या हाती सोपवणे हे पुतीन यांच्यापुढील मोठे आव्हान असणार आहे. वॅगनर प्रकरणाने साम्यवादानंतरचा पुतीन यांचा रशिया कशा प्रकारच्या दलदलींमध्ये अडकला आहे हे रशियन जनतेला आणि बाहेरील जगाला कळाले आहे, हे त्याहून मोठे आव्हान पुतीन यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
(लेखक एमआयटी, पुणे इथे कार्यरत आहेत)

परिमल माया सुधाकर

Back to top button