कृषी दिन विशेष : आर्थिकदृष्ट्या कोलमडलेल्या शेतकर्‍याला हवा मदतीचा आधार | पुढारी

कृषी दिन विशेष : आर्थिकदृष्ट्या कोलमडलेल्या शेतकर्‍याला हवा मदतीचा आधार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  निसर्गाचे वारंवार येणारे अतिवृष्टीचे संकट. त्यामुळे कष्टाने पिकविलेल्या मालाला मिळणारा अत्यल्प भाव. यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडलेला आहे. त्या शेतकर्‍याला सरकारकडून आर्थिक मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे. सरकारने शेतकर्‍यांना खराखुरा आधार दिल्यास तीच खरी माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक यांना आदरांजली ठरेल.

राज्यातील शेतकरी सर्वच बाजूंनी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे. काळ्या मातीतून सोने पिकविण्याची धमक त्या शेतकर्‍यांमध्ये आहे, मात्र पिकविलेल्या सोन्याला बाजारात कवडीमोल दराने विकावे लागत आहे. त्याने शेतकरी बेजार झाला आहे. कोणत्याही प्रकारचे उत्पादन शेतीतून घेतले तरी त्याला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्यामुळे तो पुरता कोलमडून गेला आहे. एकीकडे बाजारात भाव मिळत नाहीत, तर दुसरीकडे निसर्ग काही केल्या पाठ सोडायला तयार नाही. अशा दुहेरी दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे. मागील वर्षी राज्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकर्‍यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यातून तो पुरता सावरलेलाही दिसत नाही.

मागील वर्षी द्राक्ष, कांदा, भाजीपाला यापैकी कोणत्याच पिकांना योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याला सरकारकडून मदत देण्याची घोषणा केली, मात्र अद्यापही अनेक शेतकर्‍यांना त्या मदतीपासून वंचितच राहावे लागले आहे. अद्यापही अनेक शेतकर्‍यांना ती मदत मिळाली नसल्याने तो पुरता खचला आहे.

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकर्‍यांच्या मदतीची रक्कम वाढविली आहे, पण ती मदत वेळेत मिळत नसल्याची खंत आजही तशीच आहे. खरेतर शेतकर्‍यांना सरकारच्या मदतीची अपेक्षाच नाही, मात्र त्याने घाम गाळून पिकविलेल्या मालाला बाजारात योग्य किंमत मिळावी, एवढीच माफक अपेक्षा शेतकर्‍यांची आहे. मालाला योग्य भाव मिळाल्यास शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा शेतकर्‍यांना नाही, पण तसे होताना दिसत नाही. कांदा, द्राक्ष, भाजीपाल्यांची पिके यासारख्या मालाला हमीभाव देण्यासंदर्भात काही विचार भविष्यात सरकारला करता आला, तर तो करणे गरजेचे आहे.

शेतकर्‍यांसाठी सरकारने आता एक रुपयांमध्ये पीक विमा योजना आणली आहे. ही योजना अतिशय चांगली आहे. त्याचा उपयोगही शेतकरी करुन घेतील. मात्र तिची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करुन त्याचा फायदा शेतकर्‍यांना कसा होईल, याकडे सरकारने लक्ष देण्याची अपेक्षा आहे. एकूणच आर्थिकदृष्ट्या विवंचनेत असलेल्या शेतकर्‍याला सरकारकडून मदतीची अपेक्षा केली जाते. त्या अपेक्षेनुसार शासनाने शेतकर्‍यांना आधार दिला तर दिलासा मिळणार आहे. त्यामुळे सरकारच्या मदतीकडे लक्ष लागले आहे.

निसर्गाची नेहमीच अवकृपा होत आहे. कष्टाने पिकविलेला माल बाजारात नेईपर्यंत खात्री नाही. तेथे माल पोहोचलाच तर त्याला काय भाव मिळेल, हेही आमच्या हातात नाही. त्यामुळे सरकारने आम्हाला मदत देण्यापेक्षा आमच्या मालाला हमीभाव द्यावा, एवढीच आजच्या कृषिदिनानिमित्त अपेक्षा आहे.
– प्रशांत भोसले, शेतकरी

Back to top button