Team India : ‘हे’ सहा खेळाडू नव्या WTC दरम्यान करतील पदार्पण | पुढारी

Team India : ‘हे’ सहा खेळाडू नव्या WTC दरम्यान करतील पदार्पण

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाला (Team India) पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौ-यावर जाणार आहे. दोन कसोटी सामन्यांनी या दौ-याची सुरुवात होणार असून भारतीय संघ याच मालिकेच्या माध्यमातून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC)च्या नव्या पर्वाला प्रारंभ करेल. दरम्यान, बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीने कसोटी मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यात नव्या चेह-यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे येणा-या काळात भारतीय संघाच्या डब्ल्यूटीसी मोहिमेत अनेक नवे खेळाडू प्रदार्पण करतील यात शंका नाही.

यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal)

जैयस्वालने प्रथम श्रेणीचे सामने खेळताना 26 डावात 80.21 च्या सरासरीने धावा जमवल्या आहेत. ठोस तंत्रासोबतच त्याच्याकडे आक्रमकताही आहे, जी त्याने केवळ प्रथम श्रेणीसह आयपीएलमध्येही दाखवली आहे. अगदी अलीकडे, त्याने मध्य प्रदेश विरुद्ध इराणी कप सामन्यात 213 आणि 144 धावांची खेळी केली. स्पर्धेच्या इतिहासात एका फलंदाजाने एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे. सलामीशिवाय गरज पडल्यास तिसऱ्या क्रमांकावरही तो फलंदाजीही करू शकतो.

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)

ऋतुराजने अलीकडच्या काळात टी-20 क्रिकेटमध्ये अधिक यश मिळवले आहे. मात्र असे असले तरी तो कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. 28 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 47 डावांमध्ये 42.19 च्या सरासरीने 1941 धावा केल्या असून त्याच्या बॅटमधून 6 शतके आणि 9 अर्धशतकेही झळकली आहेत. याशिवाय त्याची आयपीएलमधील कामगिरीही उत्कृष्ट राहिली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी या मोसमात 16 सामन्यांमध्ये 42.14 च्या सरासरीने आणि 147.50 च्या स्ट्राइक रेटने 590 धावा चोपल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 अर्धशतके झळकली.

सर्फराज खान (Sarfaraz Khan)

सर्फराज खानने गेल्या तीन वर्षांपासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. तो ज्या प्रकारे खेळत आहे, ते पाहता त्याची निवड भारतीय कसोटी संघात करावी अशी अपेक्षा चाहते करत आहेत. त्याच्या निवडीच्या दाव्याला सर्फराजची धावांची आकडेवारी बळकटी देतात. कमीतकमी 50 डाव खेळणा-यांमध्ये त्याची प्रथम श्रेणी सरासरी केवळ सर डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षा कमी आहे. तथापि, शॉर्ट बॉलवर खेळण्याच्या काही अडचणी भेडसावतात त्यावर त्याचे प्रशिक्षक काम करून घेत आहेत. तो शरीरयष्टीवरून ट्रोल होत असतो. त्यामुळे त्याला तो ‘क्रिकेट फिट’ नाही हा समज दूर करण्याची गरज आहे. तो सध्या 25 वर्षांचा आहे आणि तो नक्कीच आपल्या कौशल्यात सुधारणा करून टीम इंडियाचे दरवाजे ठोठावू शकतो.

मुकेश कुमार (Mukesh Kumar)

बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश सातत्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. तो ऑस्ट्रेलियाच्या हेझलवूडला आपला आदर्श मानतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचे चांगले रेकॉर्ड आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून तो भारत अ संघात नियमित खेळत आहे. त्याने 39 प्रथम श्रेणी सामन्यात 21.55 च्या सरासरीने 149 बळी घेतले आहेत. भारत अ साठी, त्याने 17.5 च्या प्रभावी सरासरीने 18 बळी मिळवले आहेत. न्यूझीलंड अ आणि बांगलादेश अ विरुद्ध त्याने 5-5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

तिलक वर्मा (Tilak Varma)

तिलक हा पारंपरिक हैदराबादी फलंदाज आहेत. दुखापतीमुळे तो शेवटचा रणजी हंगामात खेळू शकला नाही, पण त्याचे टेंपरामेंट आणि तंत्र त्याला कसोटी क्रिकेटसाठी सक्षम उमेदवार बनवतो. त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटचा फारसा अनुभव नाही, पण ज्या-ज्यावेळी त्याला संधी मिळाली त्यावेळी त्याने आपल्या क्षमतेची झलक दाखवली आहे. न्यूझीलंड अ संघा विरुद्ध भारत अ संघासाठी खेळताना त्याने पहिले प्रथम श्रेणीतील शतक झळकावले होते.

अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran)

ईश्वरनने भारत अ संघासाठी सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याचे तंत्र उत्कृष्ट आहे आणि तो आव्हानात्मक परिस्थितीतही तो स्वत: सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असतो. 2013 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ईश्वरन गेल्या तीन वर्षांपासून निवडकर्त्यांच्या रडारवर आहे. 150 प्रथम-श्रेणी डावांमध्ये त्याने 47.85 च्या सरासरीने 6556 धावा केल्या आहेत. 233 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. जैस्वालप्रमाणे तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबरोबरच सलामीला येऊ शकतो. तो आयपीएलसाठी करारबद्ध नाही, पण जेव्हा तो देशांतर्गत क्रिकेट खेळत नाही तेव्हा तो इंग्लंड किंवा बांगलादेशला जाऊन तिथे क्लब क्रिकेट खेळतो.

Back to top button