Rohit Virat on Break : आशिया चषकापूर्वी रोहित आणि विराट घेणार महिनाभराचा ब्रेक! मग कर्णधार कोण? | पुढारी

Rohit Virat on Break : आशिया चषकापूर्वी रोहित आणि विराट घेणार महिनाभराचा ब्रेक! मग कर्णधार कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Virat on Break : भारतीय संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 ते 16 जुलै आणि 20 ते 24 जुलै दरम्यान दोन कसोटी सामन्यांनी होणार आहे. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. या दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर विराट कोहलीच्या खांद्यावर चमकदार फलंदाजीचा भार असेल. पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले असून अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. पण या मालिकेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भारतीय संघ 1 ऑगस्ट रोजी विंडिज विरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्यानंतर 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान पुन्हा पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेतून बाहेर राहू शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या दोन्ही मोठ्या खेळाडूंनी 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर एकही टी-20 सामना खेळलेला नाही. तेव्हापासून या फॉरमॅटमध्ये फक्त हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसत आहे. तसेच विंडिजविरुद्धच्या मालिकेत आयपीएल स्टार यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंह यांसारख्या नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, टी-20 मालिकेसाठीचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. (Rohit Virat on Break)

विराट आणि रोहित महिनाभर विश्रांती घेणार? (Rohit Virat on Break)

एकदिवसीय मालिका 1 ऑगस्टला संपणार आहे. या वर्षी होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकावर विराट आणि रोहितचे लक्ष केंद्रित करणे. त्यासाठी त्यांना 8-9 महिन्यांपासून टी-20 सम्घातून वगळण्यात आले आहे. 13 ऑगस्टनंतर टीम इंडियाला आयर्लंडचा छोटा दौराही करायचा आहे ज्यात टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यामध्येही हार्दिकच्या नेतृत्वाखाली युवा संघ मैदानात उतरेल यात शंका नाही. त्यानंतर 31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पहिले चार सामने पाकिस्तानमध्ये होणार असून टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या उत्तरार्धात टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. आशिया कपमध्ये रोहित आणि विराट पुन्हा एकदा पुनरागमन करताना दिसतील. त्याआधी दोघेही एक महिन्यापेक्षा जास्त विश्रांती घेऊ शकतात.

संघात युवा खेळाडूंना संधी मिळणार (Rohit Virat on Break)

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघ जाहीर करण्यात आला असून, त्यात यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार असे नवे चेहरे दिसणार आहेत. यानंतर टी-20 मालिकेत तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि यशस्वी यांसारख्या खेळाडूंची एंट्री होऊ शकते. संघाची घोषणा अद्याप व्हायची आहे, परंतु 2024 साली होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता निवड समिती हार्दिक पंड्यासाठी नवीन भारतीय सेना तयार करण्याची योजना आखू शकते. टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये 3, 6 आणि 8 ऑगस्ट रोजी टी-20 सामने खेळणार आहे. त्याचवेळी, या मालिकेतील शेवटचे दोन सामने 12 आणि 13 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवले जाणार आहेत.

Back to top button