कुडाळात राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार दिवस आंदोलन | पुढारी

कुडाळात राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार दिवस आंदोलन

कुडाळ : पुढारी वुत्तसेवा गद्दारांनी घेतला खोका महाराष्ट्रातील जनतेला दिला धोका…,५० खोके एकदम ओके….अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शिंदे गटाच्या ५० आमदारांचा निषेध केला. लोकशाहीतील आजचा काळा दिवस असल्याचेही यावेळी राष्ट्रवादीच्यावतीने जाहीर करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,कोकण प्रदेश महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, शिवाजी घोगळे, सुनील भोगटे, बाळ कनयाळकर आदी उपस्थित होते.
तत्कालीन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ५० आमदारांनी महाविकास आघाडीच्या पाठित खंजीर खुपसला आणि ते दि.२९ जुनला गुवाहटीला निघून गेले. त्याला मंगळवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध आंदोलन केले. महाराष्ट्राच्या लोकशाहीतला आजचा हा काळा दिवस तसेच “जागतिक गद्दार दिवस” म्हणून सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने साजरा केला.

आज (मंगळवार) सकाळी ११ वाजता कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयासमोर ५० खोक्यांचा प्रतिकात्मक देखावा तयार केला. त्या खोक्यांना चप्पलांचा हार घालुन सौ.घारे-परब यांच्या हस्ते प्रतिकात्मक पुजा केली. तसेच टाळ मृदंग वाजवित निषेध व्यक्त केला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button