“ये फेव्हीकॉल का जोड है टुटेगा नही” : जाहिरात वादानंतर एकनाथ शिंदे यांचा दावा | पुढारी

"ये फेव्हीकॉल का जोड है टुटेगा नही" : जाहिरात वादानंतर एकनाथ शिंदे यांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : “आमच सरकार जनसामान्यांच सरकार आहे. ही युती स्वार्थासाठी झालेली नाही तर २५ वर्षांपासून वैचारीक भूमिकेतून झाली आहे. फडणवीस आणि माझी जीवाभावाची मैत्री आहे. ये फेव्हीकॉल का जोड है टुटेगा नही,” असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. पालघर येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते.

जाहिरात वादानंतर आज प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघर येथील कार्यक्रमात एकत्र आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आमचं सरकार सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. हे सरकार जनसामान्यांच सरकार आहे, हाच मविआ आणि आमचं सरकार यांच्यात फरक आहे. डबल इंजिन सरकार येण्यापूर्वी सर्व कामांना ब्रेक लागला होता. देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांच्या अनुभवाचा आता फायदा झाला. त्यांनी सुरू केलेले प्रकल्प नंतरच्या सरकारने बंद केले होते. मात्र आमचं सरकार येताच सर्व कामांना वेग आला,” असेही शिंदे यांनी सांगितले.

“ही युती खुर्चीसाठी किंवा स्वार्थासाठी झालेली नाही तर ही युती २५ वर्षांपासून वैचारीक भूमिकेतून झाली आहे. कोणी काही म्हटलं तरी हे एका विचारांच सरकार आहे. फडणवीस यांच्याशी माझी मैत्री खूप जुनी आहे. ही दोस्ती तुटायची नाही. ये फेव्हीकॉल का जोड है, कोणी कीतीही प्रयत्न केला तरी तुटणार नाही,” असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खा. राजेंद्र गावीत, आमदार जितेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.

Back to top button