‘ज्ञानोबा-माउली’च्या गजरात माउलींच्या पालखीचे प्रस्थान; पालखी आज पुण्यात मुक्कामी | पुढारी

‘ज्ञानोबा-माउली’च्या गजरात माउलींच्या पालखीचे प्रस्थान; पालखी आज पुण्यात मुक्कामी

आळंदी : श्रीकांत बोरावके/नरेंद्र साठे

चला हो । पंढरीशी जाऊ,
जिवाच्या जिवलगा पाहू ।
भिवरे स्नान करुनीया।
संत-पद-धूळ शिरि लावू
॥॥धृ0॥॥
बोधरूप तुळशीच्या माळी,
श्रवण-मणि चंदनही भाळी ।
करू मननाचिया चिपळी,
निजध्यासे हरी गाऊ ॥1॥।

‘ज्ञानोबा-माउली’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने रविवारी (दि. 11) सायंकाळी देऊळवाड्यातून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. यंदा प्रस्थान गेल्या वर्षीपेक्षा तब्बल अडीच तास अगोदर वेळेत उरकले. पाऊस लांबल्याने वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत असल्याचे दिसून आले. या वेळी अवघी अलंकापुरी ‘माउली-माउली’च्या गजराने दुमदुमली होती. सोमवारी (दि. 12) पहाटे माउलींची पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे.

माउलींच्या समाधी मंदिरात पहाटे चार वाजता घंटानादाने या वैभवी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर काकडा आरती झाली, पहाटे सव्वाचार ते साडेपाच या वेळात माउलींना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारतीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सकाळी
नऊ माऊलींच्या समाधीच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दुपारी 12 च्या सुमारास माऊलींना महानैवेद्य दाखविण्यासाठी दर्शनबारी बंद करण्यात आली. त्यानंतर गाभारा स्वच्छ करून समाधीस पाणी घालण्यात आले. त्यानंतर दुपारी साडेबारा ते दोन या कालावधीत पुन्हा भाविकाना दर्शन खुले करण्यात आले. त्यानंतर प्रस्थानाच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली.

महाद्वार, हनुमान आणि पान दरवाजा बंद करून पोलिसांनी मंदिर परिसर रिकामा केला. दुपारी दोन वाजता मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून आत सोडण्यास सुरुवात करण्यात आली. मानाच्या 47 दिंड्या देऊळवाडा परिसरात दाखल झाल्यानंतर ‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने अवघा मंदिर परिसर दुमदुमला होता. पांढरे शुभ्र बंडी-धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी, हातात टाळ, पताका घेऊन असलेला वारकरी आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी यांचे लयबद्ध संचलन, देऊळवाड्यात या वारकर्‍यांनी उभारलेले मनोरे, महिलांच्या फुगड्या आणि फेर आणि टिपेला पोहोचलेल्या टाळ-मृदंगाच्या गजरात देहभान हरपून नाचणारे टाळकरी यामुळे हा सोहळा अधिकच रंगला.

दुपारी पाच वाजता ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या मानाच्या हिरा व मोती अश्वाचा देऊळवाड्यात प्रवेश झाला. सहा वाजता मानापानाच्या कार्यक्रमानंतर प्रस्थानापूर्वी समाधी मंदिरात गुरू हैबतबाबांच्या व संस्थांच्या वतीने सायंकाळी सव्वासहा वाजता माऊलींची आरती घेण्यात आली. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास माऊलींच्या पालखीने वीणा मंडपातून प्रस्थान ठेवले. नगरप्रदक्षिणा घालून रात्री उशिरा पालखी माऊलींचे गांधी वाडा, दर्शनबारी मंडपात विसावली.

हेही वाचा

Ashadhi wari 2023 : अवघे पुणे शहर होणार भक्तीमय

कोकणासह गोव्यात मान्सून दाखल; चार दिवसांत उर्वरित राज्य व्यापणार

धर्मांतर प्रकरणात शाहनवाजला अलिबागमध्ये बेड्या

Back to top button