कोकणासह गोव्यात मान्सून दाखल; चार दिवसांत उर्वरित राज्य व्यापणार | पुढारी

कोकणासह गोव्यात मान्सून दाखल; चार दिवसांत उर्वरित राज्य व्यापणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नैर्ऋत्य मान्सून अरबी समुद्राकडून रविवारी कोकणासह गोव्यात दाखल झाला. यंदा तो चार दिवस उशिराने पोहोचला आहे. दक्षिण कोकण व संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापण्यास सुरुवात झाली आहे. चोवीस तासांत तो आणखी सक्रिय होईल. पुढील तीन-चार दिवसात तो महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचण्याचा अंदाज आहे.

मान्सून लवकरच मुंबईसह महाराष्ट्र काबीज करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, मान्सूनची दुसरी शाखाही सक्रिय झाली असून, तो बंगालच्या उपसागराकडून बिहारमार्गे 48 तासांत उत्तर भारतात प्रवेश करणार आहे. नैर्ऋत्य मान्सूनचे रविवारी दुपारी दीड वाजता कोकण आणि गोव्यात आगमन झाले. वैभववाडीत सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

दरम्यान, दक्षिण कोकणातील काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व आंध्र प्रदेशचा काही भाग त्याने व्यापला. त्यामुळे राज्यात पुढच्या चार ते पाच दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, नाशिक, रायगड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील अनेक शहरांत पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण कर्नाटक, आंध्र प्रदेशचा अधिक भाग आणि बंगालच्या उपसागराच्या अधिक भागांमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. यावेळी ढगाळ वातावरण असेल; तर वादळी वार्‍यासह काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलला

बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पश्चिम किनारपट्टी भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाले. गेल्या 12 तासांमध्ये चक्रीवादळ हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकत आहे. तशी शक्यता हवामान खात्याने याआधीच वर्तवली होती.

मान्सून 48 तासांत मुंबईत…

बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पश्चिम किनारपट्टी भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण झाले. पुढील 48 तासांत मान्सून पुढे सरकत मुंबईत दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

हेही वाचा

पुणे : बालचमूंना खुणावतेय युनिकॉर्न, छोटा भीमचा डब्बा

Ashadhi wari 2023 : अवघे पुणे शहर होणार भक्तीमय

गोव्यात समुद्रात पोहण्यास बंदी

Back to top button