मगरीशी केली स्टंटबाजी अन् क्षणार्धात त्याचा पाय जबड्यात! | पुढारी

मगरीशी केली स्टंटबाजी अन् क्षणार्धात त्याचा पाय जबड्यात!

वॉशिंग्टन : सोशल मीडियावर वन्य-सागरी प्राण्यांशी संलग्न व्हिडीओ बरेच पसंद केले जातात. यात त्या प्राण्यांची मस्ती आणि त्यांच्यातील जुगलबंदी दिसून येते; पण काही वेळा या प्राण्यांशी मस्तीचे प्रकार अंगलट आले तर काय होऊ शकते, याची प्रचिती अलीकडेच आली. जंगली प्राण्यांचा मुळातच काहीही भरवसा नसतो. त्यांचा मूड कसा बदलेल, हे कोणीही सांगू शकत नाही. त्या पार्श्वभूमीवर अंगावर काटा आणणारा हा किस्सा खूप काही शिकवून जातो.

इन्स्टाग्रामवर स्नूपडॉग या अकाऊंटवर शेअर केल्या गेलेल्या व्हिडीओत धोकादायक मगरीबरोबर स्टंट करणे किती महागाचे पडले, हे दिसून आले. धोकादायक कसरतीच्या नावाखाली एका व्यक्तीने आपला पाय मगरीच्या तोंडाजवळ नेला. यावेळी छायाचित्र काढून घेण्यापूर्वीच त्या मगरीचा मूड बदलला आणि तो पाय पकडल्याने या व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे, याची कल्पना आल्याने सर्वच जण गर्भगळित झाले.

स्टंटच्या नावाखाली धोकादायक प्राण्यांच्या जवळ जाताना खूपच काळजी घ्यावी लागते. यामध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालण्याची जोखीम तर आहेच. शिवाय, प्राण्यांशीदेखील हा दुर्व्यवहार आहे. एक तर नैसर्गिक अधिवासात न राहता मनुष्याच्या बंधनाखाली असे प्राणी असतात. त्यातही अशी आगळीक झाली, तर ते आणखी बेचैन होतात. सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज व लाईक्सच्या नादात स्वत:ला किती जोखमीत आणणार, हा प्रश्नही येथे निर्माण होतो.

Back to top button