इंद्रायणीच्या काठी लोटला वैष्णवांचा सागर ! माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला दोन ते अडीच लाख भाविक | पुढारी

इंद्रायणीच्या काठी लोटला वैष्णवांचा सागर ! माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला दोन ते अडीच लाख भाविक

श्रीकांत बोरावके/नरेंद्र साठे : 

आळंदी :

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाईं रे ।

क्रोध अभिमान गेला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ।।
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरविती गळां ।

टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ।।

टाळ-मृदंगाचा टिपेला पोहोचलेला भक्तिकल्लोळ… माउली- माउली असा अखंड जयघोष.. वैष्णवांच्या मेळ्याने बहरून आलेला इंद्रायणीचा काठ.. माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा.. अशा वातावरणाने अलंकापुरी दुमदुमून गेली. यंदाच्या सोहळ्यात सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी हजेरी लावली. मान्सून लांबल्याचा फटका यंदाच्या वारीत दिसून येत असून उष्णतेमुळे भाविकांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा आषाढीवारीसाठी मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून दिंड्या आळंदीत दाखल झाल्या. दिंडीतील भाविकांनी इंद्रायणी घाटावर फुगडीचा फेर धरला तर काहींनी टाळ मृदूंगाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला.

पहाटेपासूनच वारकऱ्यांच्या राहुट्या व धर्मशाळांमधून अभंगाच्या सुरावटी निघू लागल्या आहेत. टाळ-मृदंगाचा गजराने आसमंत भरून गेला असून स्नानासाठी इंद्रायणीच्या तीरावर वारकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. स्नानानंतर माउलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दर्शनबारी पूर्णपणे भरून गेली होती. यंदाच्या सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी आळंदी पालिका व जिल्हा प्रशासनाकडून विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : 

Fire In Dharavi : धारावीत इमारतीला आग; तरुण जखमी, तर चिमुरडीसह नऊ जणांना श्वसनाचा त्रास

छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ महाराजांची पालखी जुने दादेगाव गावकऱ्यांनी अडवली

 

Back to top button