पुणे : आषाढी वारीत मोबाईल चोरीचा आखत होते कट; त्या आधीच पोलिसांनी… | पुढारी

पुणे : आषाढी वारीत मोबाईल चोरीचा आखत होते कट; त्या आधीच पोलिसांनी...

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पालखीतील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल, मंगळसूत्र आणि पाकिट चोरी करणार्‍यांच्या टोळ्या शहरात दाखल होत असतात. तसेच स्थानिक चोरटे गर्दीचा फायदा घेत संधी साधत असतात. मोबाईल चोरीच्या इराद्याने फिरत असलेल्या दोन मोबाईल चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 10 हजार रुपये किमतीचे एकूण 7 मोबाईल हस्तगत केले आहेत.

देहू येथून संतश्रेष्ठ जगदगुरु श्री तुकाराम महाराज 10 जून तर आळंदी येथून 11 जून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्या अनुषंगाने पुणे शहर पोलिस दलाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताची आखणी केलेली आहे. युनिट पाचकडील पथक हडपसर व वानवडी पोलिस हद्दीत पालखी मार्गावर गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते.

या वेळी त्यांना पालखीच्या वेळी वारक-यांच्या गर्दीचा फायदा उठवत मोबाईल चोरी करण्याच्या इराद्याने शहरात फिरत असलेल्या चोरट्यांबाबत खबर मिळाली. त्यानुसार हडपसर येथील रविदर्शन चौकात श्रीकांत राजू जाधव (21, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) आणि दिलीप बलभीम गायकवाड (33, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांची अंगझडती घेतली असता, 1 लाख 10 हजार रुपये किमतीचे एकूण 7 मोबाईल फोन मिळाले. त्यांनी ते मोबाईल फोन हडपसर, मुंढवा, बंडगार्डन, बिबवेवाडी भागातून चोरल्याचे सांगितले. चोरलेले मोबाईल फोन कर्नाटकला पाठविण्याच्या तयारीत हे चोरटे होते. आरोपी श्रीकांत जाधववर घरफोडी, पाकिटमारी, मोबाईल चोरीचे एकूण 24 गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस उपनिरीक्षक चैत्राली गपाट, अविनाश लोहोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

खास पथके तैनात

पालखी सोहळ्याचे 12 जूनला पुण्यात आगमन होणार असून, 12 व 13 तारखेला पुण्यात पालखी मुक्कामी आहे. त्यादृष्टीने गुन्हे शाखेची खास पथके तैनात केलेली आहेत. पालखी सोहळ्यामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चेन व मोबाईल चो-या करणारे चोरटे सक्रिय होतात. त्या अनुषंगाने ही पथके कार्यवाही करत आहेत.

हेही वाचा

पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

नगर : पादचार्‍याला लुटणारी टोळी गजाआड

पदविका प्रवेशप्रक्रियेसाठी राज्यातील सुविधा केंद्रे निश्चित

Back to top button