तिशीतच थायरॉईडची व्याधी; रुग्णांत 80 टक्के महिला; बदलत्‍या जीवनशैलीचा परिणाम, व्यायाम, आयोडिनची कमतरता | पुढारी

तिशीतच थायरॉईडची व्याधी; रुग्णांत 80 टक्के महिला; बदलत्‍या जीवनशैलीचा परिणाम, व्यायाम, आयोडिनची कमतरता

सातारा, मीना शिंदे : प्रदूषण, चुकीचा आहार-विहार, आयोडिनची कमतरता, व्यायामाचा अभाव यामुळे कमी वयातच शरीरातील थायरॉईडच्या घटकांचा असमतोल निर्माण होत आहे. परिणामी तिशीतील तरुणाई थायरॉईडची शिकार होत असून त्यासंबंधित विविध आजार जडत आहेत. व्यक्तिगत आरोग्याकडे महिलांचे दुर्लक्ष होत असल्याने थायरॉईड रुग्णांमध्ये 80 टक्के महिला रुग्ण असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मानवी शरीर विविध ग्रंथी व मांसपेशींनी बनलेले आहे. गळ्याच्या भागात फुलपाखराच्या आकाराची थायरॉईड ग्रंथी असते. डोक्यापासून पायापर्यंत सर्वच अवयवांना आवश्यक असलेले हार्मोन्स (संप्रेरके) तयार करण्याचे काम या थायरॉईड ग्रंथी करतात. शरीरातील थायरॉईडचे असंतुलन इतर अवयवांंच्या कार्यप्रणालीवर परिणाम करतात. यामुळे हृदयविकार, हाडांचे आजार, शरीराची वाढ खुंटणे, वजन जास्त वाढणे किंवा अतिशय कमी होणे, शरीरात गुंतागुंत निर्माण होणे आदी त्रास होतो. महिलांमध्ये पाळी येण्यातली अनियमितता हे थायरॉईडसंबंधी विकाराचे प्रमुख लक्षण आहे. पाळीमधल्या अनियमिततेमुळे अनेक मुलींच्या मनात थायरॉईडचा धसकाच बसत आहे. पुढे गर्भधारणेचा विचार करताना अनेक प्रश्न त्यांना भेडसावतात.

थायरॉईडमुळे उद्भवतात हे आजार

थायरॉईडमुळे ग्रंथीची होणारी अनिर्बंध वाढ म्हणजे गलगंड. हायपो किंवा हायपर थायरॉईडिझममध्ये ही स्थिती येऊ शकते. तसेच आयोडिनची मात्रा कमी झाल्यानेही गलगंड होतो. थायरॉईडच्या पेशीतून स्रवणारे हार्मोन्स कमी पडल्यास त्या त्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो. त्यातून त्या अवयवाशी संबंधित आजार जडतात. जर मेंदूला थायरॉईडचे हार्मोन्स कमी पडले तर मेंदूशी निगडित आजार उद्भवतात. त्याचप्रमाणे हृदय, पेशी, स्नायू, हाडे अशा विविध अवयवांमध्ये थायरॉईडच्या असंतुलनामुळे संबंधित आजार बळावतात. गरोदर मातांच्या आहारात आयोडिनचे प्रमाण कमी असल्यास जन्माला येणार्‍या बाळात थायरॉईड ग्रंथीशी संबंधित समस्याही आढळू शकतात.

Back to top button