नगरमध्ये लव्ह जिहादची सात प्रकरणे : किरीट सोमय्या | पुढारी

नगरमध्ये लव्ह जिहादची सात प्रकरणे : किरीट सोमय्या

नगर : पुढारी वृत्तसेवा : लव्ह जिहाद प्रकरणी आज नगर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. नगर जिल्ह्यात लव्ह जिहादची सुमारे सात प्रकरणे आहेत. ‘द केरला स्टोरी’ पाहिल्यानंतर मुलांच्या पालकांची हिंमत वाढली. त्यामुळे ती प्रकरणे आज समोर आली आहे. हिंदू भगवा मोर्चा व केरला स्टोरीमुळे समाजात जागृती झाल्याचा दावा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी (दि. 7) येथे केला. कर्जत तालुक्यातील लव्ह जिहाद प्रकरणी सोमय्या यांनी बुधवारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. समवेत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे होते.

सोमय्या म्हणाले, लव्ह जिहाद प्रकरणी कर्जत तालुक्यातील कुटुंबासह नगर जिल्ह्यातील पीडित कुटुंबाची भेट घेतली. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व अन्य अधिकार्‍यांबरोबर सविस्तर चर्चा झाली आहे. त्यातील काही आरोपी पकडले गेले आहेत. काही आरोपींचा पोलिस तपास करीत आहेत. औरंगजेबाच्या पोस्टरबाबत सोमय्या म्हणाले, या आतंकवादाला बाहेरच्या देशातील संघटनांकडून फूस मिळते. त्यामुळे औरंग्याचे पोस्टर झळकले. त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे.

ठाकरेंच्या हाती हिरवा झेंडा
राज्यात 32 ते 33 महिने सगळीकडे हिरवे हिरवे होते. सगळेच हिरवा झेंडा घेऊन फिरत होते. तिन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये मुस्लिम लांगुलचालनाची स्पर्धा चालू होती. उद्धव ठाकरे यांनी भगवा सोडून हिरवा हातात घेतला. त्यामुळे आता हिंदू आक्रोश मोर्चामुळे समाजात जागृती होऊ लागली आहे.

Back to top button