वाळकी : शेतरस्त्याच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी | पुढारी

वाळकी : शेतरस्त्याच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेतातील रस्त्यावर शेततळे बांधण्याच्या वादातून दोन गटांत तलवार, लोखंडी रॉड, लाकडी काठ्यांचा वापर करून जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील सातजण जखमी झाले असून, परस्पर विरोधी फिर्यादींवरून तेराजणांसह व इतर 20 ते 25 जणांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नगर तालुक्यातील अकोळनेर शिवारात ही घटना घडली.

अकोळनेर शिवारात तळेमळा परिसरात असलेल्या शेतातील रस्त्यावर एका गटाने शेततळे करण्याचे काम सुरू केले. त्यावरून हा वाद झाला. त्या वादाचे पर्यावसान जोरदार हाणामारीत झाले. यावेळी तलवारीसह लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांचा वापर करण्यात आला. या तुफान हाणामारीत एका गटातील बाळासाहेब शंकर शेळके, आदेश बाळासाहेब शेळके, निलेश नाथा देशमुख, नाथा मुरलीधर देशमुख हे चार जण, तर दुसर्‍या गटातील सीताराम उर्फ बाळासाहेब नारायण गारुडकर, शुभम सीताराम गारुडकर, विनायक सीताराम गारुडकर हे तीन असे सात जण जखमी झाले आहेत.

या संदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात पहिली फिर्याद सीताराम उर्फ बाळासाहेब नारायण गारुडकर (वय 60, रा.तळेमळा, अकोळनेर, ता.नगर) यांनी दिली. या फिर्यादीवरुन बाळासाहेब शेळके, नाथा देशमुख, निलेश देशमुख, यशवंत देशमुख, रोहिदास देशमुख, कुंडलिक गारुडकर, विठ्ठल गारुडकर, दादा मोटे (सर्व रा. अकोळनेर) व इतर 20 ते 25 जण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी फिर्याद नाथा मुरलीधर देशमुख (वय 60, रा.अकोळनेर, ता.नगर) यांनी दिली. त्यावरून आरोपी सीताराम नारायण गारुडकर, शुभम सीताराम गारुडकर, विनायक सीताराम गारुडकर, शकुंतला नारायण गारुडकर (सर्व रा.अकोळनेर, ता.नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा

नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल

श्रीगोंदा : उसाच्या पेमेंटसाठी शेतकर्‍यांचे उपोषण

Back to top button