श्रीगोंदा : उसाच्या पेमेंटसाठी शेतकर्‍यांचे उपोषण | पुढारी

श्रीगोंदा : उसाच्या पेमेंटसाठी शेतकर्‍यांचे उपोषण

श्रीगोंदा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा शुगर अलाईड इंडस्ट्रिज लिमिटेड या कारखान्याचे सन 2022-23 चे 2700 रुपये प्रति टनाप्रमाणे बाजार भाव देऊ, असे सांगितले. मात्र, करमाळा आणि परांडा तालुक्यातील शेतकर्‍यांना 6 महिने उलटून दमडीही न दिल्याने, या शेतकर्‍यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

सन 2022-23 या गळीत हंगामासाठी विक्रम बबनराव पाचपुते यांच्या खासगी मालकीचा साईकृपा शुगर अलाईड इंडस्ट्रिज लिमिटेड हिरडगाव या कारखान्याने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, धाराशीव जिल्ह्यातील परांडा येथील शेतकर्‍यांना प्रतिटन 2 हजार 700 रुपये बाजार भाव देऊ असे सांगून, ऊस गाळपासाठी आणला. गाळपानंतर 15 दिवसांत 2 हजार 700 रुपये प्रमाणे प्रति टन रक्कम देणे बंधनकारक असताना, सुमारे 6 महिने उलटून गेले तरी वेळोवेळी पत्र व्यवहार करून, पाठपुरावा करून हेलपाटे मारूनही अद्यापपर्यंत शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपये कारखाना प्रशासनाने दिले नाहीत.

या उलट कारखान्याने प्रत्येक शेतकर्‍याच्या उसाच्या वजनाचे 5 टक्के वजनात व वाहतूक कपात केली आहे. सध्या मुलांचे शिक्षणासाठी वह्या, पुस्तके, फी कपडे तसेच शेतीसाठी खते, औषध, बी बियाणे मशागतीसाठी आमच्याकडे पैसे नाहीत. बँक, पतसंस्था यांचे कर्ज आणि हात उसनवारी घेतलेले पैसे याचेच व्याजदर वाढत चालले आहेत अशी भावना उपोषणकर्त्या शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अन्यथा आमचे करमाळा व परंडा तालुक्यातील शेतकर्‍यांचे बिलाची रक्कम व्याजासह त्वरित देण्यात यावी, यासाठी अ‍ॅड. राहुल सावंत, बाळासाहेब गायकवाड, राहुल चव्हाण, विलास बरडे, करमाळा, सुखदेव चव्हाण, नंदकुमार पाटील, सुनील चव्हाण, अंगत चव्हाण, नाना चव्हाण, हनुमंत पाटील, देविदास पाटील, वसंत चव्हाण, धनंजय कुलकर्णी , सुभाष गणेशकर ,दत्तात्रय सरोदे, रमेश पाटील, बाबासाहेब पाटील, युवराज दळवी, सुग्रीव चव्हाण, सोमा धनवे, अनिल पुंडे, वालचंद रोडगे यांनी सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

अन्यथा तीव्र आंदोलन : अ‍ॅड.सावंत

साईकृपा शुगर अलाईड इंडस्ट्रिज कारखाना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समुहास भागीदारीत चालविण्यास दिला असून, उसाच्या पेमेंटची काहीच अडचण नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही विश्वास ठेवून कारखान्यास ऊस दिला. मात्र, आमच्या कष्टाच्या घामाचा एक रुपयाही अद्यापपर्यंत मिळाला नाही. ऊस बिलाची रक्कम लवकर न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असे अ‍ॅड.राहुल सावंत यांनी दिली.

हेही वाचा

नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल

पाथर्डी : स्वत:ची विहीर खुली करत भागविली तहान

धुळे : गुंगीकारक औषधाची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या

Back to top button