केंद्रीय पथकाच्या छाप्यात 85 टन हातमिश्र खत जप्त | पुढारी

केंद्रीय पथकाच्या छाप्यात 85 टन हातमिश्र खत जप्त

कोल्हापूर, सुनील सकटे : कृषी विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. हातमिश्र खताच्या तपासणीसाठी कृषी विभागाच्या केंद्रीय पथकाने जिल्ह्यात 11 तालुका संघांच्या गोदामांवर छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. धरणांच्या तालुक्यात टाकलेल्या छाप्यात 50 किलोच्या एक हजार 700 बॅगा म्हणजेच 85 टन खत जप्त केले आहे. या खतामध्ये भेसळ आढळल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याला प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात 11 तालुका संघांत हातमिश्र खत तयार केले जाते. मात्र या उत्पादनात सुपर फॉस्फेट कमी प्रतीचे वापरल्याचे छाप्यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे कृषी विभागाच्या नियंत्रणाखालील या 11 तालुका संघाच्या खताची केंद्रीय यंत्रणेने तपासणी केली. यामध्ये वर उल्लेख असलेल्या संघातील खते मोठ्या प्रमाणात जप्त केली.

या खतामध्ये रत्नागिरी येथील एका कंपनीने कमी प्रतीचे सुपर फॉस्फेट वापरून मासळी खताऐवजी चक्क माती वापरल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार घडलाच कसा, अशी चर्चा सुरू आहे. कारवाई होऊन चार ते पाच दिवस होऊनही याबाबत शेतकर्‍यांसाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी अद्याप काहीच भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संबंधित संघातील खताचे नमुने पुण्यातील कृषी आयुक्तालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र कृषी विभागातून हे प्रकरण दडपण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधला असते मिटिंगचे कारण सांगून संपर्क तोडण्यात आला.

Back to top button