विरोधी पक्षांची ‘एकजूट’ बैठक पडली लांबणीवर! आता २३ जूनला होणार चर्चा | पुढारी

विरोधी पक्षांची 'एकजूट' बैठक पडली लांबणीवर! आता २३ जूनला होणार चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भाजप विरोधी पक्षांच्‍या एकजुटीसाठी बिहारचे मुख्‍यमंत्री नितीशकुमार सरसावले आहेत. यासाठी
त्‍यांनी प्रादेशिक पक्षांच्‍या प्रमुखांबरोबर चर्चाही केली आहे.  भाजपविरोधी पक्षांच्‍या एकजुटीसाठी १२ जून रोजी पाटणा येथे बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. ( Opposition Parties meeting ) नितीशकुमार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही बैठक होणार होती. मात्र ही बैठक लांबणीवर पडली आहे, असे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे.

काँग्रेसने केले होते बैठकीची तारीख बदलाचे आवाहन

विरोधी पक्षांनी एकत्रित चर्चा करण्‍यासाठी पाटणा येथे १२ जून रोजी बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. मात्र त्‍यापूर्वीच काँग्रेसने स्‍पष्‍ट केले होते की, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. यासंदर्भात पक्षाचे संपर्क प्रभारी जयराम रमेश म्हणाले होते की, दोन्ही नेते बैठकीला उपस्थित राहू शकत नसले तरी पक्षाचा एक सदस्य प्रतिनिधी म्हणून बैठकीला उपस्थित असेल. काँग्रेस पक्षाने बैठकीची तारीख पुढे ढकलण्‍याचे आवाहनही केले होते. रमेश यांच्या टिप्पणीनंतर तीन दिवसांनी ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा झाली आहे.

नितीश कुमारांनी घेतली होती प्रमुख नेत्‍यांची भेट

नितीश यांनी १२ एप्रिल रोजी पहिल्यांदा काँग्रेस नेत्यांची भेट घेतली होती, त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्यासोबतची बैठक विरोधी एकजुटीच्या दिशेने एक ‘ऐतिहासिक पाऊल’ ठरेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला जात होता. यानंतर नितीश कुमार यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्‍यासह भाजप विरोधी पक्षांच्‍या नेत्‍यांची बैठक घेतली होती.

१२ जून रोजी पाटणा येथे होणारी बैठक ही विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्यासाठी नितीश कुमारांचा प्रयत्‍न असल्‍याचे मानले जात होते. आता ही बैठक २३ जून रोजी होईल, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button