अंबाबाई मंदिराच्या आवारातील वटपूजनावेळी दोर्‍यांनी घेतला पेट | पुढारी

अंबाबाई मंदिराच्या आवारातील वटपूजनावेळी दोर्‍यांनी घेतला पेट

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : श्री अंबाबाई मंदिराच्या आवारात असलेल्या वडाच्या झाडाचे पूजन करताना झाडाला बांधलेल्या दोर्‍यांनी पेट घेतल्याने आग लागली. यावेळी महिलांची तारांबळ उडाली मंदिर परिसरात जुने डेरेदार वडाचे झाड आहे. वटपौर्णिमेदिवशी नवविवाहितांसह अनेक सुवासिनी या झाडाचे पूजन करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही वटपूजनासाठी महिलांची गर्दी होती.

पूजा करण्यासाठी सुरू असलेल्या लगबगीत पेटता कापूर आणि उदबत्तीची झळ व शेजारी असणार्‍या कापसाच्या वाती यामुळे झाडाला बांधलेल्या दोर्‍यांना लागली. क्षणार्धात झाडाला गुंडाळलेल्या दोर्‍याने पेट घेतला. झाडाला बांधलेला दोरा गोलाकार जळत असल्याने वडाच्या काही पारंब्यांनीही पेट घेतला.

आग लागल्याचे लक्षात येताच मंदिर परिसरातील लोक व देवस्थानचे कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी धावले. अग्निरोधक मशिनच्या सहाय्याने लागलेली आग पंधरा मिनिटांत विझविण्यात आली. आग लागल्याची घटना घडल्यानंतर देवस्थान समितीने दोन महिला आणि पुरुष कर्मचार्‍यांची या ठिकाणी नेमणूक केली. झाडाच्या जवळ कापूर आणि उदबत्ती लावणे महिलांनी टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले.

Back to top button